September 17, 2024

Samrajya Ladha

नांदे गावच्या सरपंच निकिता शेखर रानवडे यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार प्रदान….

पुणे :

सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे नांदे गावच्या विद्यमान सरपंच निकिता शेखर रानवडे यांना पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, आमदार अभिमन्यू पवार, आमदार सुनील शेळके, आमदार कृष्णा गजबे, महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद अध्यक्ष दत्ता काकडे व महाराष्ट्रातून आलेले सरपंच व विविध सरकारी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या देशाच्या पंचायत राज्य व्यवस्थेत सरपंच हा महत्त्वाचा दुवा असून गावच्या प्रगतीस महत्त्वाची भूमिका बजावत असतो त्यामुळेच अशा कार्यक्षम सरपंचांचा गौरव करणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे असे वक्तव्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सरपंचांना कार्यालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित सरपंचांमधून प्राथमिक स्वरूपात सरपंच निकिता रानवडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत मला आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा केवळ माझा सन्मान नसून गावातील प्रत्येक नागरिकांचा व माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकार्यांचा सन्मान आहे. भविष्यात आणखी उत्साहात गावासाठी विविध उपक्रम राबवित काम करत राहणार आहे.

मुळशी तालुक्यातील नांदेगावच्या ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच आदर्श सरपंच पुरस्कार निकिता रानवडे यांच्या रूपाने प्राप्त झाल्याने नांदे गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. नांदे गावात मोठया उत्साहात आनंद व्यक्त करण्यात आला, तर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात प्रथमच आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्या बद्दल सरपंच निकिता शेखर रानवडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.