November 22, 2024

Samrajya Ladha

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या ऑनलाईन तिकीट प्रणाली नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद

पुणे :

पुणे महापालिकेच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्राच्या तिकीटाची प्रणाली ऑनलाईन करण्यात आली आहे. या माध्यमातून घरबसल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे ऑनलाईन तिकीट काढता येत असल्याने या प्रणालीला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय.

कात्रज परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र निर्माण केले
आहे. या संग्रहालयात विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, साप पाहायला मिळतात. हे संग्रहालय पाहण्यासाठी राज्याच्या
विविध भागातून लोक येत असतात. यात शाळांच्या सहलीचे प्रमाण देखील मोठे असते. शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी झू मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे कधी कधी नागरिकांना तिकिटासाठी वाट पाहावी लागत होती. हे टाळण्यासाठी पुणे महापालिकेने प्राणी संग्रहालयासाठी स्वतंत्र पोर्टल सुरु केले आहे. या माध्यमातून नागरिक घरबसल्या ऑनलाईन तिकीट काढू शकतात.

पुणे महापालिकेच्या या उपक्रमांला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विदेशी नागरिकांसाठी प्रति १०० रुपये, लहान मुलांसाठी फ्री तर भारतीय नागरिकांसाठी ४० रुपये तिकीट दर असून ऑनलाईन तिकीट काढण्याची प्रक्रिया अतिशय
सोपी व सुलभ करण्यात आली आहे. याशिवाय व्हिडिओ कॅमेऱ्याचे २०० रुपये व फक्त फोटोसाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याचे ५० रुपये तिकीट दर आहे. दिव्यांग व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचे तिकीट आकारण्यात येणार नसून त्यांना प्राणिसंग्रहालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. तर, प्रत्येक बुधवारी प्राणिसंग्रहालयाला साप्ताहिक सुट्टी असणार आहे. तर, इतर दिवशी हे प्राणिसंग्रहालय सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० याकाळात सुरू असेल. तरी जास्तीतजास्त नागरिकांनी ऑनलाईन तिकीट प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

ऑनलाईन तिकीट कसे काढता येईल?
* सर्वात प्रथम PMC CARE च्या अॅप वर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
* त्यानंतर तुमच्या प्रोफाइलमध्ये 'झू बुकिंग' विभागात जा.
* तारीख आणि वेळ निवडा.
* आवश्यक तिकिटांची संख्या टाका.
* पेमेंट करा.