January 29, 2025

Samrajya Ladha

क्रेडाई महाराष्ट्राचे प्रथमच व्हिएतनाम येथे आंतराराष्ट्रीय अधिवेशन संपन्न…

पुणे :

“देशाच्या अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पुढील आर्थिक वाढीस चालना देण्याची क्षमता या क्षेत्रात असून रोजगार निर्मितीतही हे क्षेत्र दुसऱ्या स्थानावर आहे. विकसित देशांप्रमाणेच आपल्या देशातही अनेक संधी उपलब्ध होत असून प्रगतशील उद्योगातही बांधकाम क्षेत्र अग्रेसर ठरत आहे.” असे प्रतिपादन क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील यांनी येथे केले.

 

बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून प्रचलित असलेल्या क्रेडाई महाराष्ट्र या संस्थेचे ९ वे वार्षिक अधिवेशन “महाकॉन” पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भरविण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अरियाना कन्व्हेन्शन सेंटर, द नांग, व्हिएतनाम येथे नुकतेच हे अधिवेशन पार पडले.

क्रेडाई-नॅशनलचे सचिव जी. राम रेड्डी यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. असे अधिवेशन प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असून विकसकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा अधिवेशनाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

खैरनार पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्राच्या वार्षिक योजना, उपक्रम आणि धोरणांचा आढावा घेतला. क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांच्या “words of wisdom” या भाषणातून उपस्थितांना त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. क्रेडाई-महाराष्ट्रचे सहसचिव व महाकॉनचे संयोजक आशिष पोखरणा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंह जबिंदा, राजीव पारीख क्रेडाई-महाराष्ट्राचे सचिव विद्यानंद बेडेकर देखील उपस्थित होते.

अधिवेशनाच्या सत्रातून बांधकाम क्षेत्रातील नामवंत व प्रख्यात व्यक्तींचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभले. यात प्रामुख्याने, प्रख्यात वक्ते मिस्टर जेम्स लॉ यांनी टीयर २ आणि ३ शहरांसाठी फ्यूचरिस्टिक आर्किटेक्चर, रघुराज पंड्या यांनी बांधकाम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञान यांचा वापर, डॉ. अनिल लांबा यांनी प्रकल्पातील नफा वाढवणे, श्रवी सारंगन यांनी उंच इमारती – संधी आणि आव्हाने, अविनाश पोद्दार यांनी आयटी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा RERA, IT आणि GST च्या दृष्टीकोनातून घ्यायची खबरदारी व वापर, अनिकेत भराडिया आणि मुरलीकृष्ण व्ही. यांनी रिअल इस्टेटमधील स्टार्ट अप्स आणि फंडांचे वैविध्य, तर श्री सोनू शर्मा यांनी रिअल इस्टेटसाठी सक्सेस ब्लू-प्रिंट व्यवसाय याबाबत आपले विचार मांडले.

क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, रसिक चौहान, अनिश शाह, राजेंद्र यादव, खजिनदार नरेंद्रसिंग जबिंदा, सहसाचिव दिनेश ढगे, रवींद्र खिलारे, शांताराम पाटील, धर्मवीर भारती, अधिवेशनाचे संयोजक आशिष पोखरणा यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अमरावती, अहमदनगर, छ. संभाजीनगर, लातूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सिन्नर शहराच्या अध्यक्ष आणि सभासदांचा विशेष सहभागीत्वाबद्दल सत्कार करण्यात आला. ३५ शहरांतील सुमारे ४०० हून अधिक सदस्य या अधिवेशनात सहभागी झाले होते.

You may have missed