November 9, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बालेवाडी येथील मुक्ताईनगर रस्ता डांबरीकरण पूर्ण; बाबुराव चांदेरे व राहुल बालवडकर यांच्या प्रयत्नामुळे नागरिकांना दिलासा..

बालेवाडी :

बालेवाडी परिसरातील मुक्ताईनगर गावठाण रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून नागरिकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून खड्डे, चिखल आणि धुळीमुळे हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत होता. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांतून आणि नागरिकांच्या सहकार्याने हा रस्ता आता दर्जेदार डांबरीकरण करून नव्याने तयार करण्यात आला आहे.

“आता मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांना खऱ्या अर्थाने सुखकर प्रवासाचा दिलासा मिळेल. या रस्त्याचा थेट फायदा शाळेत जाणाऱ्या मुलांना, रोजंदारी कामगारांना आणि ज्येष्ठांना होईल,” असे बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.

या कामासाठी मा. सरपंच गणपतआप्पा बालवडकर यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे आभार आणि सहकार्य करणाऱ्या किसन बाप्पू बालवडकर, दिलीप बालवडकर, निलेश बालवडकर, चंद्रकांत कांबळे यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच मुक्ताईनगरच्या नागरिकांचा विश्वास आणि राहुल बालवडकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले, असेही चांदेरे म्हणाले.

यावेळी पोलिस पाटील आनंदा कांबळे, संदीप बालवडकर, अशोक बालवडकर, ज्ञानेश्वर भाऊ बालवडकर, बाळासाहेब कांबळे, हर्षल तापकीर यांच्यासह मुक्ताईनगर येथील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.