March 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.

अभ्यासात सातत्य व नियोजन आणि स्वतःवर विश्वास आल्यास यश मिळतेच – बेरड साहेब : वरिष्ठ पोलिस अधिकारी

 

सुस :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या सूस शाखेतील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सन २०२५–२६ बॅचचा संयुक्त फेअरवेल (निरोप समारंभ) अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात मोठ्या थाटात संपन्न झाला . हा कार्यक्रम शाळेच्या भव्य पटांगणात ” “पेरीविंकल क्रीडा संकुल” येथे आयोजित करण्यात आला होता आणि हा निरोपसमारंभ म्हणजे विद्यार्थ्यांच्या शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनातील एक अविस्मरणीय सोहळा ठरला.

कार्यक्रमासाठी शाळेचे मैदान अतिशय सुंदररीत्या सजवण्यात आले होते. या सजावटीमध्ये शिवराज सर तसेच नववी– व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग होता. अनेक शिक्षकवृंदांनीही या उपक्रमात मोलाची मदत केली. संपूर्ण परिसर आनंदी, उत्साही व भावपूर्ण वातावरणाने भारलेला होता.

कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या आगमनाने व सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे माननीय छबुदास बेरड साहेब– Assistant Police Inspector (API), पुणे गुन्हे शाखा, श्री. संजय पन्हाळकर – उद्योजक श्री. संदीप ढमढेरे – उद्योजक तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल, सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुणेरी पगडी, शाल, नारळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून शिक्षकांविषयी असलेले प्रेम, कृतज्ञता व आदर व्यक्त केला. शिक्षकांनी दिलेले संस्कार, मार्गदर्शन व पाठबळ यामुळेच आम्ही या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहोत, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. अनेक भाषणे ऐकताना वातावरण अत्यंत भावनिक झाले असून विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचेही डोळे पाणावले.

मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळवणे नव्हे, तर स्वतःला घडवणे होय. शाळेत शिकलेली शिस्त, मूल्ये आणि संस्कार आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील. आत्मविश्वास ठेवा आणि सदैव सकारात्मक विचार करा आणि जीवनाच्या परीक्षेत खंबीरपणे सामोरे जा असा संदेश दिला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र बांदल सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की“यश मिळवताना कष्ट, संयम आणि सातत्य फार महत्त्वाचे असते. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. शाळेने दिलेले मार्गदर्शन तुमचा योग्य दिशादर्शक ठरेल असे सांगून आजचे विद्यार्थी उद्याचे पेरीविंकल चे आदर्श ठरतील व या मंचावर आमंत्रित होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. 

यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. ऊर्जादायी व भावस्पर्शी नृत्यप्रस्तुतीने उपस्थितांची मने जिंकली व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनीही शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांना व शाळेला भेटवस्तू प्रदान करून शाळेबद्दलचे प्रेम व आदर व्यक्त केला. हा क्षण अत्यंत हृदयस्पर्शी ठरला.

प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आजचे सन्माननीय अतिथी वरिष्ठ पोलिस अधिकारी श्री बेरड साहेब यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. कुठल्याही क्षेत्रात गेलात तरीही त्यात अव्वल होण्याचा प्रयत्न करा व ही पिढी सक्षम होण्यासाठी कार्य करा. शिक्षकांवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाज व देशासाठी करा. परीक्षेत यश मिळवणे महत्त्वाचे आहेच, पण आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत माणूस म्हणून जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे असे सांगून प्रमुख पाहुणे API श्री बेरड साहेब यांनी त्यांचे प्रेरणादायी विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी मुक्तपणे आनंद साजरा केला व सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. हसत–खेळत, आठवणी शेअर करत विद्यार्थ्यांनी हा क्षण मनापासून अनुभवला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक माननीय श्री राजेंद्र बांदल सर ,संस्थापिका सौ.रेखा बांदल , शिवानी बांदल, मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित , पर्यवेक्षक श्री सचिन खोडके , स्मिता श्रीवास्तव, नेहा माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल पाटील यांनी अत्यंत प्रभावी व संयत पद्धतीने केले. इव्हेंट हेड योगिता ढाणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा फेअरवेल सोहळा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एक भावस्पर्शी कविता सादर केली. विद्यार्थ्यांविषयी असणारा जिव्हाळा, प्रेम, आपुलकी व माया, तसेच विद्यार्थी घडवताना शिक्षकांना कधी कठोर भूमिकाही घ्यावी लागते, हे भाव कवितेतून व्यक्त करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. अत्यंत उत्साह पूर्ण व भावस्पर्शी आणि यशस्वीरित्या व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा निरोपसोहळा संपन्न झाला.