August 3, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*”‘मोठी स्वप्ने पाहा… भारत घडवा!’ — भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा बावधन येथील पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत !!!!*

*पेरिविंकल बावधन शाखेत राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे ग्रँडनेफ्यू ए. पी. जे. एम. जे. शेख सलीम यांचा उपस्थितांशी प्रेरणादायी संवाद*….

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बावधन शाखेत भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून जगभर ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी विचारांचा अमूल्य वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या ग्रँडनेफ्यू (Grandnephew) म्हणजेच नातू. माननीय ए. पी. जे. एम. जे. शेख सलीम यांच्या विशेष प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे भव्य आणि उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

 

विज्ञान, राष्ट्रप्रेम, चारित्र्य, नेतृत्व, सकारात्मक विचार आणि विकसित भारताचे स्वप्न या मूल्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ए. पी. जे. एम. जे. शेख सलीम, मा. श्री. दिलीप देशमुख, मा. श्री. कुणाल शाह, मा. श्री. मिलिंद चौधरी, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, माननीय संचालिका सौ. रेखा बांदल, माननीय संचालिका कु. शिवानी बांदल, माननीय संचालक श्री. यश बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उत्स्फूर्त स्वागताने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण सभागृहात प्रेरणा, आदर आणि राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर विद्यार्थिनी कु. शार्वरी थोरात हिने डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर, त्यांच्या वैज्ञानिक कार्यावर, राष्ट्रनिर्माणातील योगदानावर आणि “विकसित भारत” या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण स्वप्नावर प्रभावी भाषण सादर केले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल यांनी आपल्या मनोगतात डॉ. कलाम यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा वारसा जपणारे ए. पी. जे. एम. जे. शेख सलीम यांचे संस्थेत मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद हा केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा संस्कारमय अनुभव असतो. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांशी जोडण्याचा संस्थेचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.

यानंतर ए. पी. जे. एम. जे. शेख सलीम यांनी विद्यार्थ्यांशी अत्यंत हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि संवादात्मक शैलीत संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिज्ञा (Positive Affirmations) करून घेत आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि स्वअनुशासनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी डॉ. कलाम यांची अत्यंत प्रेरणादायी “I Am Born with Potential” ही कविता प्रभावीपणे सादर केली. कवितेतील प्रत्येक ओळ विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्याची, मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अविरत परिश्रम करण्याची प्रेरणा देणारी ठरली.

आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “मोठी स्वप्ने पाहा; कारण मोठी स्वप्नेच मोठे व्यक्तिमत्त्व घडवतात. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. तुमची पार्श्वभूमी, परिस्थिती किंवा अडचणी तुमचे भविष्य ठरवत नाहीत; तर तुमची जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुमचे यश निश्चित करतात.” प्रत्येक अपयश हे नव्याने शिकण्याची आणि अधिक सक्षम होण्याची संधी असते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास जागविला.

त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल फोनचा मर्यादित वापर करण्याचा, नियमित वाचनाची सवय लावण्याचा, वेळेचे नियोजन करण्याचा, प्रत्येक व्यक्तीचा आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याचा, निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचा तसेच स्वतःच्या यशाबरोबर समाज आणि राष्ट्रासाठीही योगदान देण्याचा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध, मूल्याधिष्ठित आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांकडून “मी माझ्या राष्ट्राचा अभिमान वाढवीन, माझ्या देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करीन आणि एक आदर्श नागरिक बनेन.” अशी प्रेरणादायी राष्ट्रप्रतिज्ञा करून घेतली.

मा. श्री. दिलीप देशमुख यांनी आपल्या मनोगतात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन तसेच ISRO यांच्याशी समन्वय साधून पेरिविंकल संस्थेतील विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.

या संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रेरणादायी विचारच नव्हे, तर राष्ट्रप्रेम, विज्ञाननिष्ठा, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी, सकारात्मक दृष्टिकोन, नेतृत्वगुण आणि जीवनमूल्यांची समृद्ध शिकवण मिळाली. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

या कार्यक्रमास पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत शिस्तबद्ध ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली समन्वयक सायली गायकवाड आणि शिरीन काझी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत अल्प कालावधीत उत्कृष्ट नियोजन करून अथक परिश्रम घेतले. विशेषतः चित्रकला शिक्षिका सौ. प्राजक्ता पिल्ले आणि सौ. नीता पवार यांनी सभागृहाची आकर्षक सजावट, कलात्मक मांडणी आणि कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत मोलाचे योगदान दिले. कार्यक्रम प्रमुख सौ. वृशाली ब्रह्मे आणि सौ. स्वाती कोल्हे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी लागणारा समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी अत्यंत कुशलतेने पार पाडली.

हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका सायली गायकवाड आणि शिरीन काझी यांच्या नेतृत्वाने तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या समर्पित योगदानामुळे हा प्रेरणादायी कार्यक्रम अत्यंत दिमाखात, शिस्तबद्ध आणि अविस्मरणीय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा प्रकाश विद्यार्थ्यांच्या मनात चेतविणारा आणि “मोठी स्वप्ने पाहणारी, विज्ञाननिष्ठ, मूल्याधिष्ठित व राष्ट्राभिमानी पिढी घडविण्याचा” दृढ संकल्प अधिक बळकट करणारा हा कार्यक्रम पेरिविंकलच्या शैक्षणिक वाटचालीतील एक संस्मरणीय अध्याय ठरला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या पर्यवेक्षिका सायली गायकवाड यांनी केले.