बाणेर :
बाणेर येथील सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेसच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई केली असून, याच सर्व्हे नंबरमधील विकासक संजय बूब यांच्या मालकीच्या जागेवर विकसित होत असलेल्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ या प्रकल्पाला स्टॉपवर्क (काम थांबवा) आदेश देण्यात आला आहे.
रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेस, मंजूर लेआउटमधील रस्ते आणि विकास हक्कांच्या वापराबाबत श्री. मुकुंदा तुकाराम तापकीर यांनी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींमध्ये अॅमेनिटी स्पेसपर्यंत मुख्य रस्त्यापासून लेआऊट मध्ये आवश्यक असलेला ९ मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध नसल्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला होता.
सदर प्रकरणात रोहन लेहेर लेआउटचे विकसक आणि रेजेन्सी अस्ट्रा प्रकल्पाचे विकासक संजय बूब यांच्याशी संबंधित जागा व विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापालिकेच्या कागदपत्रांनुसार, सर्व्हे नं. ५४/१, ५४/२ व ५४/६ या मिळकतींच्या लेआउटला ४ मे २००९ रोजी मंजुरी देण्यात आली होती. संबंधित अॅमेनिटी स्पेस सन २०१० मध्ये पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्याची नोंद आहे.
मात्र, अॅमेनिटी स्पेसच्या उपलब्धतेबाबत तसेच तिच्याशी संबंधित एफएसआयच्या वापराबाबत गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. या अॅमेनिटी स्पेसवरील कोट्यवधी रुपयांच्या एफएसआयचा गैरवापर झाला आहे का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या ताब्यातील अॅमेनिटी स्पेसशी संबंधित एफएसआयचा वापर करून विकासकाला आर्थिक लाभ झाला असल्यास, त्याचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. या प्रकरणात महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून नुकसानभरपाई वसूल केली जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
केवळ रेजेन्सी अस्ट्रा प्रकल्पाला स्टॉपवर्क देऊन हे प्रकरण संपणार नाही. रोहन लेहेर लेआउटमधील अॅमेनिटी स्पेसच्या मूळ मंजुरीपासून ते प्रत्यक्ष एफएसआय वापरापर्यंत संपूर्ण व्यवहाराची चौकशी होणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या ताब्यातील जागेशी संबंधित विकास हक्कांचा वापर नेमका कसा झाला? त्यातून किती आर्थिक लाभ झाला? महापालिकेचे किती नुकसान झाले? आणि हे नुकसान विकासनकरता यांच्याकडून वसूल केले जाणार का?
हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत.
बाणेरमधील या प्रकरणात पुणे महानगरपालिका केवळ स्टॉपवर्कपुरती कारवाई करणार की अॅमेनिटी स्पेसच्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून महापालिकेच्या नुकसानीची वसुलीही करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


More Stories
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत आनंदाची भर; बाणेर नागरी पतसंस्थेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..