November 3, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..

म्हाळुंगे :

शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी – हे महाराष्ट्राचे अभिमानाचे क्रीडा मंदिर आहे की खाजगी कंपन्यांचे मंगल कार्यालय? हा संतप्त सवाल आज हजारो खेळाडू विचारत आहेत.*

दोन दिवसांपूर्वी या संकुलात एका मोठ्या खाजगी कंपनीच्या ५० वर्षपूर्तीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमासाठी खेळाडूंच्या घामाने पवित्र झालेला मुख्य क्रीडांगण आणि वॉर्म-अप ट्रॅक अक्षरशः विकून टाकण्यात आला.

*परिणाम काय?*
या एका कार्यक्रमासाठी स्टेडियम कार्यक्रमाच्या ८ दिवस आधी आणि कार्यक्रम संपल्यानंतर ४ दिवस म्हणजे जवळपास १० ते १२ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.

यामुळे कोणाचे नुकसान झाले?
१. पोलीस भरतीसाठी जीव तोडून सराव करणारे हजारो प्रशिक्षणार्थी.
२. महिन्याचे पैसे भरून जिम आणि ट्रॅकची फी भरणारे सामान्य खेळाडू.
३. या संकुलात घडणारे खरे हिरे – *खेलो इंडिया, क्रीडा प्रबोधिनी, लक्षवेध, आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू.*

खेलो इंडिया आणि प्रबोधिनीचे निवडक खेळाडू मेन ट्रॅकवर सराव करतात, पण या योजनेत न निवडलेले पण तेवढेच गुणवंत असलेले शेकडो नॅशनल, इंटरनॅशनल खेळाडू वॉर्म-अप ट्रॅकवरच आपले भविष्य घडवत असतात. या सर्वांच्या १२ दिवसांच्या मेहनतीवर, त्यांच्या करिअरवर या खाजगी इव्हेंटने पाणी फिरवले. बाहेर डांबरी रस्त्यावर जीव धोक्यात घालून सराव करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

*सरकारचा अध्यादेश फाट्यावर!*

काही वर्षांपूर्वी याच स्टेडियमचा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारनेच अध्यादेश काढला होता – *”हे स्टेडियम कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी द्यायचे नाही.”* आज तो अध्यादेश या प्रशासनाने कचऱ्याच्या टोपलीत टाकला आहे. भाडेतत्त्वावर हे मैदान वाटून कोणाचे खिसे भरले जात आहेत? यातून सरकारला आणि इतर हितसंबंधीयांना किती आर्थिक लाभ होतो, हा मोठा प्रश्न आहे. स्वतःच्या आर्थिक लाभासाठी खेळाडूंच्या आयुष्याशी हा उघड खेळ नाही का?

*मैदान की दारूचा अड्डा?*

कार्यक्रम संपल्यानंतर सोडलेली घाण पाहून संताप अनावर होतो.

मुख्य ट्रॅकवर सगळीकडे प्लास्टिक, थर्माकोल, अन्नाचे कचरे, कपडे आणि भयानक म्हणजे *ट्रॅकवर पडलेले लोखंडी खिळे, तारा, स्टेपलर पिन्स.* एका खेळाडूचा अनवाणी पाय त्या खिळ्यावर पडला तर त्याचे संपूर्ण करिअर, त्याच्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात नष्ट होईल. याला जबाबदार कोण?

त्यापेक्षाही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे मैदानात जागोजागी पडलेल्या *दारूच्या बाटल्या, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची पाकिटे.* हा क्रीडा संकुल आहे की दारुड्यांचा अड्डा?

इथे खेळाडू घडवायचे आहेत की व्यसनाधीन पिढी घडवायची आहे? या मैदानात येणाऱ्या लेकरांना मेडलची स्वप्ने दाखवायची आहेत की व्यसनाची?

*प्रशासनाने आणि सरकारने आता तरी जागे व्हावे.*

भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल हवे आहेत, पण मेडल देणारे पाय ज्या ट्रॅकवर घडतात तोच ट्रॅक तुम्ही दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने बरबाद करत असाल तर मेडल येणार कसे?

या स्टेडियमवर खेळाडूंचा पहिला हक्क आहे, खाजगी कंपन्यांच्या मौजमजेचा नाही. खेळाडूंच्या आयुष्याशी खेळणे तात्काळ थांबवा.
१. संबंधित कंपनी व परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार का?
२. ट्रॅकची तात्काळ स्वच्छता व सुरक्षितता तपासणी करण्यात येणार का?
३. यापुढे कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी स्टेडियम देऊ नये असा सक्त आदेश काढण्यात येणार का?

 

You may have missed