November 10, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथील ननवरे चौकातील रस्त्याचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण, वाहतूक कोंडीला मिळणार दिलासा…

बाणेर :

गेल्या अनेक महिन्यांपासून ननवरे चौकाला जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत होती. बिटवाईज चौकातून मोठा वळसा घ्यावा लागत होता, वेळ वाया जात होता आणि वाहतुकीची कोंडीही वाढत होती.या समस्येवर पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर बाबुराव चांदेरे यांनी सोसायटीमधील नागरिकांच्या सहकार्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांच्या सोबत सातत्याने पाठपुरावा केला. नागरिक आणि प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नातून अखेर प्रलंबित रस्त्याच्या कामाला गती मिळाली. गेल्या तीन दिवसांपासून काम वेगाने सुरू करण्यात आले आणि आज त्याचे विविध सोसायट्यांमधील नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ननवरे चौकात हा २३-२४ मीटर रुंदीचा आणि १०० फुटी हा नवा रस्ता साकारण्यात आला असून १७ सप्टेंबर रोजी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि केवळ तीन दिवसांत, म्हणजेच २० सप्टेंबर रोजी हा रस्ता पूर्ण करून उद्घाटनही पार पडले. या रस्त्यामुळे धनकुडे वस्ती, मोहन नगर, ननवरे वस्ती या परिसरातील सोसायट्या व नागरिकांसह सूसच्या दिशेने जाणाऱ्या रहिवाशांची मोठी प्रवासाची अडचण दूर झाली आहे. या रस्त्याचे उद्घाटन कोणत्याही मान्यवरांच्या हस्ते न होता, थेट बाणेरमधील विविध सोसायटीतील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. कारण विकासकामाचा खरा लाभार्थी हा सर्वसामान्य नागरिक असतो आणि त्याच्याच हातून झालेले उद्घाटन ही लोकसहभागातून उभी राहिलेली खरी लोकशाही आहे.

हा रस्ता पूर्ण झाल्यामुळे केवळ वाहतूक सुलभ होणार नाही, तर परिसरातील रहिवाशांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. बिटवाईज चौकातून वळसा घेण्याची गरज राहणार नाही आणि ननवरे चौकातील कोंडीही मोठ्या प्रमाणावर कमी होईल. यामुळे नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित, सुंदर आणि सुव्यवस्थित वाहतुकीला चालना मिळेल. आज नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान, त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि सामूहिकतेने साध्य केलेले हे यश खरंच प्रेरणादायी आहे. हे केवळ एक रस्ता नाही, तर लोकशक्ती, नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयातून साधलेला विकासाचा नवा टप्पा आहे.

“ननवरे चौकातील हा नवा रस्ता म्हणजे नागरिकांच्या दीर्घकाळच्या समस्या दूर करणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या रस्त्याच्या कामासाठी परिसरातील नागरिकांनी सातत्याने केलेली मागणी, त्यांचा सहभाग आणि प्रशासनाने दिलेला प्रतिसाद हे यशाचे खरे कारण आहे. आज या रस्त्याचे उद्घाटन सोसायटीतील नागरिकांच्या हस्ते झाले, हेच खरे लोकशाहीचे सामर्थ्य आहे. विकासकामाचा लाभ जे घेतात, त्यांच्याच हातून झालेले उद्घाटन ही माझ्यासाठी सर्वात मोठी अभिमानाची बाब आहे. पुढेही बाणेर-सूस परिसरातील सर्व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मी नागरिकांसोबत आणि प्रशासनासोबत नेहमीच कटिबद्ध राहीन.”
बाबुराव दत्तोबा चांदेरे
(मा. स्थायी समिती अध्यक्ष- पुणे महानगरपालिका)