September 8, 2024

Samrajya Ladha

‘दगडूशेठ’ तर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील २५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील २५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

 

शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, सुभाष सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, पराग वांबुरे, विजय चव्हाण, बाळासाहेब तावरे यांसह डॉ. संजीव डोळे, डॉ.विनायक रुपनवर, डॉ.प्रदीप सेठिया, डॉ.सचिन मेहता, डॉ. केदार लोंगाणी, डॉ.दया राक्षे, डॉ.रेणुका वैद्य, डॉ.परीक्षित गोगटे आदी उपस्थित होते.

डॉ. संजीव डोळे म्हणाले, तब्बल १४ वर्षांपूर्वी या उपक्रमाला प्रारंभ झाला. आम्ही डॉक्टरांना ट्रस्टचे रुग्णसेवेची दिलेली संधी अनमोल आहे. त्यामुळे तेव्हापासून या पालकत्व योजनेतील विद्यार्थी वर्गाची आम्ही काळजी घेत आहोत.

डॉ. प्रदीप सेठिया म्हणाले, उत्तम आरोग्य टिकविणे हे महत्वाचे आहे. आहार, विहार, निद्रा या गोष्टी योग्य प्रमाणात झाल्यास उत्तम आरोग्य राहू शकते. आजारी पडू नये, यासाठी लहान मुलांची काळजी घ्यायला हवी. मुलांच्या आहारात लोह, कॅल्शियम मिळते की नाही, हे पालकांनी बघायला हवे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, लहान मुलांचे डोळे, दात यांसह संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबीरात केली जाते. तसेच या मुलांचे आरोग्यविषयक रेकॉर्ड देखील ठेवले जाते. मुलांनी आहारासोबत व्यायाम देखील करायला हवा. मानसिक तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, हे देखील मुलांना या शिबिराद्वारे सांगण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.

जय गणेश प्रांगण येथील शिबीरात ४८२ रुग्णांची तपासणी

ट्रस्टच्या जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत सिंबायोसिस हॉस्पीटल, मॉर्डन कॉलेज फिजिओथेरपी विभाग, क्रसणा डायग्नोस्टिक सेंटर, श्री सद्गुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती वैद्यकिय विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवार पेठेतील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले. सदर शिबिरात ४८२ रूग्णांनी मोफत वैद्यकीय उपचारासाठी सहभाग नोंदविला.