May 5, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाण-सोमेश्वरवाडी परिसरात रात्रीच्या वेळी वाढत्या गैरवर्तनामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना; सनी निम्हण यांची पोलीस आयुक्तांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी

पाषाण :

शहरातील पाषाण-सोमेश्वरवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी युवकांकडून नशा करून दहशत निर्माण करण्याचे आणि गैरवर्तन करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

निम्हण यांनी पत्रात नमूद केले आहे की, पाषाण परिसर हा नेहमीच एक शांत आणि सुसंस्कृत भाग म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या सुरू असलेल्या गैरवर्तनाच्या प्रकारांमुळे या भागाच्या प्रतिमेला गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्यांनी या संदर्भात चिंता व्यक्त करताना काही तातडीच्या उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले आहे.

या उपाययोजनांमध्ये रात्रीच्या वेळी संवेदनशील ठिकाणी नियमित गस्त आणि तपासणी करणे, सार्वजनिक स्थळे, उद्याने आणि बसथांबे यांसारख्या ठिकाणी अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांची निगराणी अधिक प्रभावी करणे आणि प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक नागरिक समितीच्या माध्यमातून अशा दिशाहीन युवकांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे.

माजी नगरसेवक निम्हण यांनी पोलीस आयुक्तांना या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन आवश्यक त्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सक्रिय करण्याची विनंती केली आहे. तसेच, पाषाणकरांच्या हितासाठी प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्यासाठी ते स्वतः कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले आहे.

या पत्राची प्रत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा खासदार मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील यांनाही पाठवली आहे, जेणेकरून या गंभीर विषयावर तातडीने लक्ष दिले जाईल.

आता पोलीस प्रशासन या मागणीवर काय कार्यवाही करते, याकडे पाषाण परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.