November 22, 2024

Samrajya Ladha

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन…

पुणे :

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरून ऑफलाईन अर्ज महाविद्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा ७ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्जांची छाननी करुन शिष्यवृत्तीस पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालयात सादर करावेत. महाविद्यालयांनी एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.

विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास व त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असेही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी कळविले आहे.