पुणे :
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली असून आज पुणे मराठा क्रांती मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसामध्ये निदर्शने करत जोरदार आंदोलन करून पोलिसीबळाचा आणि राज्य सरकारचाही निषेध केला आणि सर्वच मराठा लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्याची मागणी केली.
जालन्याच्या एसपींना त्वरित निलंबित करावे. कालच्या समाजबांधवांवरील लाठीचार्जचा साधा निषेधही न करणाऱ्या मराठा लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा असूनही त्यांना समाजासाठी त्यांच्या पदाचा उपयोग होत नसेल, तर त्यांनी त्यावरुन पायउतार व्हावे, राजीनामा द्यावा, सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी आंदोलकांच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर यांनी यावेळी केली.
कालच्या लाठीहल्यातून महिला, मुलांनाही सोडण्यात न आल्याने हे आंदोलन चिरडण्याचाच हेतू स्पष्ट होता, असा दावा त्यांनी केला. तरीही जाळपोळ व हिंसाचार न करता गौतम बुद्धांच्या शांततेच्या मार्गाचा अवलंब करा, असे आवाहन कुंजीर यांनी मराठा समाजाला केले आहे.
राजेंद्र कुंजीर, राजेंद्र कोंढरे, अनिल ताडगे, सचिन आडेकर, धनाजी येळकर, सतीश काळे, जीवन बोराडे, पूजा झोळे, रविंद्र माळवदकर, अमर पवार, वेणू शिंदे, आरती मारणे, प्रशांत धुमाळ, किशोर मोरे आदी आजच्या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. ‘एक मराठा, लाख मराठा,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. महिला आंदोलकांनी देखील आपल्या भावना अतिशय तीव्र स्वरूपात यावेळी मांडल्या आणि संताप व्यक्त केला.
More Stories
माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा उमेदवार…
क्रेडाई महाराष्ट्राचे प्रथमच व्हिएतनाम येथे आंतराराष्ट्रीय अधिवेशन संपन्न…
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; आपची मागणी