September 17, 2024

Samrajya Ladha

प्रो ए सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह उत्साहात साजरा

गणेशखिंड :

2020 मध्ये घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2023-24 पासून महाराष्ट्रात करण्यात आली आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज गणेशखिंड या महाविद्यालयात  दिनांक 24 ते 29 जुलै या दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्यात आला.

त्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांच्या प्रथम वर्षातील  विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. त्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी शैक्षणिक क्षेत्रात झालेले बदल यांचा मागोवा घेतला.

डॉ. खरात यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने आणलेल्या नव्या संरचनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे यावर भर दिला. तसेच गरजेनुसार शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळणं आणि बाहेर पडण्याची सुलभता म्हणजेच मल्टिपल एंट्री आणि एक्झिट मेकॅनिझम तसेच एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे सहज जाता येण्याची सोय याकडे लक्ष वेधले. त्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या श्रेयांक साठवणूक करणाऱ्या व्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच नव्या संरचनेतील अभ्यासक्रमामुळे अनेक कौशल्य विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्यामुळे ते रोजगारक्षम होतील यावर भर दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ.  गौरी कोपर्डेकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. शुभांगी जोशी, आयक्यूएसी समन्वयक पराग शाह, वाणिज्य विभागातील डॉ. मनीषा बेले, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. नीलिमा कुलकर्णी, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विनय कुमार,   संगणक विभागातील डॉ. दीपाली मेहेर आणि बीसीए विभागप्रमुख डॉ. दीपक कुंभार या शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध पैलूंवर माहिती दिली.  विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, त्यातील संरचनेचा  त्यांच्या करिअरसाठी कसा उपयोग होणार आहे, विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी, रोजगारक्षम होण्यासाठी, कौशल्य मिळवण्यासाठी या नव्या धोरणाचा कसा लाभ घेता येणार आहे याबद्दल सविस्तर विवेचन केले. 

या सप्ताहादरम्यान महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित क्विझ  घेण्यात आले. 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे फायदे या विषयावर निबंध ही सादर केले आहेत.