July 27, 2024

Samrajya Ladha

दगडूशेठ’ च्या अयोध्या श्रीराम मंदिर सजावटीचे उद्घाटन मंगळवारी (दि.१९) होणार..

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सजावटीच्या उद्घाटन करिता निमंत्रण

पुणे : 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी,  सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

मंगळवारी (दि.१९) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून श्री हनुमानाच्या ४ मूर्ती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. सायंकाळी सजावटीचे उद््घाटन करण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना  निमंत्रित केले आहे.

पुढील वर्षी सन २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी पूर्ण होत आहे, यापार्श्वभूमीवर पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदा होणारी श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरणार आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. प्रतिकृतीमध्ये २४ खांब व २४ कमानी उभारण्यात आले आहेत. मंदिराचा मुख्य घुमट १०० फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे १०८ फूट उंच मंदिर आहे. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव ११ कळस आहेत.

मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये ६० खांबांवर वानरसेनेच्या मूर्तींसह रामायणातील घटनांचा आढावा हा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात आला आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात आला आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हे देखील यंदाचे आकर्षण असणार आहे. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृती देखील लक्षवेधी ठरणार आहेत. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी सजावटीचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

बुधवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ व समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ आणि दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री गणेशयाग आणि दुपारी १ ते ५ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने लक्षअर्चनासहित नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.

उत्सवमंडपात बुधवारी (दि.२६) सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन

उत्सवमंडपात बुधवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी  ५ ते ६ यावेळेत सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यविनायक पूजा ही भगवान शंकर व पार्वती मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती, सूर्य या पाच देवतांनी सांगितली असल्याचे सत्यविनायक पोथीत सांगण्यात आले आहे. सत्यविनायक पूजेला अनन्यसाधारण महत्व असून ते भाविकांपर्यंत यामाध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.

उत्सवात श्रीं ना दररोज विविध पदार्थांचा भोग लावण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वितरण केले जाईल. मंदिर व उत्सव मंडप परिसरात येणा-या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. एकादशीच्या दिवशी दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक २८ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री गणाधिश रथातून निघणार आहे.

गणेशोत्सवात जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र व रुग्णवाहिका सेवा

जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र असणार आहेत. मंदिरासमोर संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर यांचे पहिले केंद्र असणार आहे. तर, बेलबाग चौकाजवळ सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, जहांगिर  हॉस्पिटल, ससून सर्वोपचार रुग्णालय यांचे दुसरे केंद्र असेल. याशिवाय मुख्य उत्सव मंडपाच्या मागील बाजूस तिसरे केंद्र उभारण्यात येणार असून ससून सर्वोपचार केंद्र, भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल बाणेर यांचे असणार आहे.

ट्रस्टच्या ११ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत असणार आहेत. तसेच, सिटी पोस्ट परिसरात एनएम वाडिया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन, गणपती मंदिर परिसरात जहांगिर हॉस्पिटल यांची कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज असणार आहे. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येणार असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच व ५ एलईडी स्क्रिनची सोय

पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. दिनांक १९ ते २९ सप्टेंबर पर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे.

उत्सवकाळात होणारी गर्दी पाहता ट्रस्टतर्फे श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ५ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपाच्या दोन्ही मागील बाजूस लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर व मूळचंद दुकानाशेजारी तीन एलईडी स्क्रिन तसेच बेलबाग चौक, बुधवार चौक येथे दोन स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २०० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

 

You may have missed