September 12, 2024

Samrajya Ladha

मोहीम फत्ते! गिरिप्रेमीच्या महिला संघाने ६५२९ मीटर उंच सुदर्शन शिखरावर केली चढाई

सुदर्शन शिखरावर संपूर्ण महिला संघाची मोहीम यशस्वी होण्याची घटना भारतातून प्रथमच

हिमालय :

 

माउंट मेरूच्या यशानंतर अवघ्या चारच दिवसांत गिरिप्रेमीच्या ‘पीक्युब माऊंट सुदर्शन मोहिमेच्या’ महिला संघाने भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात इतिहास घडविला. गढवाल हिमालयातील माउंट सुदर्शन या ६५२९ मीटर उंच शिखरावर गिरिप्रेमीच्या महिला संघाने यशस्वी चढाई केली. अशी कामगिरी करणारा गिरिप्रेमीचा महिला संघ हा भरतातील पहिला संघ ठरला आहे. स्मिता कारीवडेकर (मोहीम नेता) हिने आज दुपारी 12.45 मिनिटांनी सुदर्शनचा शिखरमाथा गाठत 6529 मीटरवर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकविला. त्याचबरोबर मोहिमेच्या इतर सदस्या पूर्वा शिंदे सिंग, पद्मजा धनवी, स्नेहा गुडे आणि स्नेहा तळवटकर या सर्वांनी देखील 6२०० मीटर पर्यंत मजल मारली परंतु हवामान बिघडण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी शिखरापासून केवळ काही अंतरावरून परतण्याचा निर्णय घेतला.. संघातील आणखी एक सदस्य सीमा पै यांनी 5500 मीटर पर्यंत यशस्वी चढाई केली. या संघाला मोहिमेच्या संयोजनामध्ये तसेच चढाईमध्ये गिरिप्रेमीचा गिर्यारोहक अखिल काटकर, नेहरू इंस्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंगचे प्रशिक्षक लाले थाजिल पून, मुनींदर राणा व सौरभ कुमार, तसेच ग्यालबो शेर्पा, सत्यपाल आणि अंकुल या सर्वांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. यापैकी हवालदार पून, मुनींदर राणा, ग्यालबो शेर्पा यांनी देखील शिखरमाथा गाठला.

गंगोत्री परिसरात गढवाल हिमालयामध्ये वसलेले माउंट सुदर्शन शिखर हे एक अतिशय दुर्गम व चढाईसाठी कठीण श्रेणीत गणले जाणारे शिखर आहे. सतत होणारे भूस्खलन, हिमस्खलन आणि वाटेत असणाऱ्या असंख्य हिमभेगा ही आव्हाने गिर्यारोहकांसमोर कायम असतात. या आव्हानांना तोंड देत, अरुंद कड्यांवरून चढाई करत गिर्यारोहकांना शिखराकडे मार्गक्रमण करावे लागते. गिरिप्रेमीच्या संघाने सुदर्शन शिखराच्या पूर्व धारेवरून चढाईचे नियोजन केले होते. त्यासाठी गंगोत्रीहून निघून गोमुखच्या पुढे श्वेतवर्ण हिमनदीमध्ये सुमारे 4200 मीटर वर संघाला बेस कॅम्प लावावा लागला. त्यानंतर Advacne Base Camp, कॅम्प1-1 व कॅम्प-2 सज्ज करत संघ अंतिम चढाईसाथी सज्ज झाला. या मोहिमेत सर्व सामान पुढील कॅम्पवर वाहून नेण्याचे काम सर्व महिला सदस्यांनी अगदी शेर्पांच्या बरोबरीने केले. मैलोनमैल पसरलेले मोरेन, त्यावर होणारी हिमवृष्टी यासर्वांशी संघाला झुंजावं लागलं. ५८०० मीटर उंच असलेल्या कॅम्प २ हुन संघाने ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता शिखराकडे चढाईस सुरवात केली. पहाटे पर्यंत सलग ८ तास चढाई केल्यावर सकाळच्या उन्हात हिम तापल्याने पाय बर्फात रुतायला सुरुवात झाली व शिखर चढाईचा वेग कमी झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण व अत्यंत कठीण चढाई मार्ग यांवर मात करत, अखेर संघाने ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजता म्हणजे तब्बल 13-14 तासांच्या अथक चढाईनंतर सुदर्शन शिखराचा माथा गाठला. अशा प्रकारे संपूर्ण महिलांच्या संघाने माऊंट सुदर्शन हे अतिदुर्गम शिखररावर यशस्वी चढाई करण्याची घटना भारतातून प्रथमच घडत आहे. ही बाब संपूर्ण देशातील महिला गिर्यारोहकांसाठी अतिशय अभिमानाची आहे.

या मोहिमेला उमेश झिरपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिखर चढाईविषयी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, “सुदर्शन शिखराची चढाई ही गिर्यारोहकांचा शारीरिक व मानसिक कसोटी पाहणारी तर आहेच परंतु गेल्या अनेक वर्षांत या भागात झालेल्या पडझडीमुळे आणि भूस्खलनामुळे सुदर्शनच्या बेस कॅम्पला जाणं देखील अत्यंत जिकिरीचे आहे. इथे बदलणारे हवामान व हिमप्रपातांचा धोका तर आहेच त्याबरोबर यावेळी संघाला बेस कॅम्प गाठण्यासाठी नदीवर दोरी बांधून ‘ टायरोलीन ट्रॅव्हर्स ’ नावाचं टेक्निक वापरुन पलीकडे जावे लागले. या सर्व आव्हांनानमुळे गेल्या अनेक वर्षांत कोणताही संघ याबाजूला फिरकलेला नाही. मात्र, गिरिप्रेमीच्या या महिला संघाने मोहिमेसाठी केलेल्या एक वर्षाची पूर्वतयारी व कष्टांचे फळ आज शिखर चढाईच्या रूपांत आपण बघत आहोत. गिरिप्रेमीच्या महिला संघाने अतिशय उत्तम कामगिरी करत हे यश प्राप्त केले, याचे समाधान व आनंद आहे.”

माउंट सुदर्शन मोहिमेला पी-क्यूब इंटरप्राइजेस, परिमल आणि प्रमोद चौधरी फौंडेशन, नम: रोप्स, प्राज इडस्ट्रीज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे व दिलेल्या पाठिंब्यामुळे मोहीम यशस्वी होण्यात मदत झाली. तसंच नेहरू इंस्टिट्यूट ऑफ माऊंटेनियरिंग, उत्तरकाशीचे प्राचार्य कर्नल अंशुमन भदोरिया व उपप्रचार्य मेजर डॉक्टर देवल बाजपायी यांच्या पुढाकाराने या मोहिमेला इंस्टिट्यूटच्या प्रशिक्षकांची देखील साथ मिळाली ज्यामुळे ही मोहीम सुखरूप पार पडली. गिरिप्रेमीच्या संस्थापिका सदस्या उष:प्रभा पागे यांच्याकडून प्रेरणा घेऊन गेली काही वर्षे गिरिप्रेमीची महिला गिर्यारोहकांची फळी तयार होत आहे. गंगोत्री-1 , कांगयात्से-1 व 2 या शिखरांनंतर आता सुदर्शनचं यश मिळवत गिरिप्रेमीच्या महिला संघाने भारतीय गिर्यारोहण क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

“स्त्रियादेखील पुरुषांच्या इतकंच गिर्यारोहण कौशल्य आत्मसात करू शकतात आणि इतर सर्व क्षेत्रांबरोबरच गिर्यारोहण क्षेत्रातदेखील त्या कुठेही कमी नाहीत हे गिरिप्रेमीच्या मुलींनी दाखवून दिलं. सुदर्शनच्या यशाचा आम्हाला खूप आनंद आणि अभिमान आहे. यांच्या कुटुंबीयांनी मोहिमेतील सहाभागासाठी दिलेला पाठिंबा खरोखर वाखणण्याजोगा आहे. ” असं मत उष:प्रभा पागे यांनी व्यक्त केले.