October 18, 2024

Samrajya Ladha

भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा पराभव करत जिंकला चौथ्यांदा आशिया चषक..

चेन्नई :

आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी १२ ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध मलेशिया या हॉकी संघात झाला. अखेरपर्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय हॉकी संघाने शानदार पुनरागमन करत विजय संपादन केला.याबरोबरच या स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद जिंकले.

भारताने अंतिम सामन्यात मलेशियाविरुद्ध 4-3 गोलफरकाने विजय मिळवला. याआधी भारताने 2011, 2016 आणि 2018 या तीन वर्षी आशिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

अंतिम सामन्यात हाफ टाईमपर्यंत मलेशिया या सामन्यात ३-१ अशी आघाडीवर होते. मात्र तिसऱ्या क्वार्टर्सच्या अखेरच्या मिनिटात भारताकडून हरमप्रीत सिंग आणि गुरजंत सिंगने गोल करत भारताला बरोबरी साधून दिली होती. त्यानंतर अखेरचे ४ मिनिटे बाकी असताना भारताकडून आणखी एक गोल आकाशदीप सिंगने नोंदवला. त्याआधी भारताकडून पहिला गोल जुगराज सिंगने केला होता.

जपान तिसऱ्या क्रमांकावर

अंतिम सामन्यापूर्वी जपान आणि कोरिया या हॉकी संघात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सामना रंगला. या सामन्यात जपानने ५-३ अशा फरकाने कोरियाला नमवत तिसरा क्रमांक पटकावला.