November 21, 2024

Samrajya Ladha

कोल्हापूर संघ ठरला क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीगचा विजेता..

उत्कृष्ट स्पर्धक म्हणून जयेश नरवडे पाटील, अतुल भालेकर, अमित सिंह, श्रीराम पाटील, अमरीश हाऊझवाला सन्मानित.

पुणे :

क्रेडाई महाराष्ट्र प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात छ. संभाजीनगर संघावर मात करत कोल्हापूर संघाने ४ गडी राखून विजय पटकावला. डेक्कन जिमखाना मैदान येथे हा निर्णायक सामना रंगला.

आजच्या सामन्यात दोन्ही संघांकडून सांघिक खेळाचे दर्शन घडले, त्यामुळे ही लढत अखेरपर्यंत चुरशीची ठरली. स्पर्धेनंतर क्रेडाई-नॅशनलचे कार्यकारिणी सदस्य शांतिलाल कटारिया, एचडीएफसीचे बिझनेस हेड कार्तिक अय्यर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सचिन मुळे यांच्या हस्ते विजयी संघास ‘सीएमपीएल करंडक’ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी क्रेडाई-नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजीव परीख, अध्यक्ष प्रमोद खैरनार, सचिव विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सुनिल कोतवाल, अदित्य जावडेकर, सहसचिव सर्वश्री रविंद्र खिल्लारे, दिनेश ढगे, शांताराम पाटील, आशिष पोकर्णा, धर्मवीर भारती आणि सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज अमित सिंह ( इचलकरंजी), उत्कृष्ट गोलंदाज श्रीराम पाटील (कोल्हापूर), उत्कृष्ट यष्टिरक्षक अमरीश हाऊझवाला (छ. संभाजीनगर) , मालिकावीर जयेश नरवडे पाटील (छ.संभाजीनगर), अंतिम सामन्यातील उत्कृष्ट स्पर्धक अतुल भालेकर या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आज अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून छ. संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी अमरीश हाऊझवाला ( १५ चेंडूत १५ धावा ), मनोज दरक ( २५ चेंडूत १८ धावा) , जयेश नरवडे पाटील, समीर सोनावणे या फलंदाजांनी कमी चेंडूत जास्त धावा घेत संघास चांगली सुरुवात करुन दिली. परंतु, चौकार, षटकार मारून धावफलक उंचवण्याच्या प्रयत्नात ते बाद झाले. राहूल तोरबे यांनी १२ चेंडूत केलेली नाबाद २० धावांची खेळी व राहूल स्वामी यांनी ५ चेंडूत केलेल्या नाबाद १३ धावा यामुळे ११७ धावांचे आश्वासक लक्ष्य प्रतिस्पर्धी संघास देण्यात छ. संभाजीनगर संघाला यश आले. कोल्हापूर संघातील अतुल भालेकर यांनी २ गडी तर अनंत मुरगुडे, श्रीराम पाटील, नितीन अबदार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.

धावांचा पाठलाग करताना कोल्हापूर संघातील मौक्तिक पाटील यांनी ३० चेंडूत ३९ धावा केल्या. त्यांना अतुल भालेकर यांनी २२ चेंडूत २७ धावा करत उत्तम साथ दिली. नितीन अबदार, श्रीराम पाटील, अनंत मुरगुडे यांनी देखील कमी चेंडूत जास्त धावा करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. अचूक गोलंदाजी करत छ. संभाजीनगर संघाच्या समीर सोनवणे यांनी ३ गडी बाद केले. तर राहूल तोरबे, जयेश नरवडे पाटील, अखिल भालेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. परंतु, कोल्हापूर संघाने १५ षटके पूर्ण होण्याआधीच धावांचे लक्ष्य पार केल्याने छ. संभाजीनगर संघातील गोलंदाजांची मेहनत अयशस्वी ठरली. आणि जेतेपदाचा मान कोल्हापूर संघाच्या पारड्यात गेला. पण सामना एकाकी न झाल्याने शेवटच्या षटकापर्यंत स्पर्धेतील उत्सुकता टिकून राहिली.

क्रेडाई महाराष्ट्राच्या या स्पर्धेत राज्यभरातील शहरनिहाय २२ बांधकाम व्यावसायिक संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यातून स्वतःला सिद्ध करत छ. संभाजीनगर आणि कोल्हापूर हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने सामने आले. या स्पर्धेतील नॉक राऊंडचे यजमानत्व पुणे क्रेडाई मेट्रोने स्वीकारले होते. एचडीएफसी बँक या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, लीड प्लस, भारती & गित्ते ग्रुप, कालिका स्टील हे सहयोगी प्रायोजक होते.

संपूर्ण सीएमपीएल २०२३ च्या यशस्वीतेसाठी अमित वाघमारे, संकेत तुपे व संघटक समीर सोनावणे यांनी खूप परिश्रम घेतले.
………………

धावफलक

संभाजीनगर १५ षटकांत ५ बाद ११७ धावा
(पराभूत )
राहूल तोरबे १२ चेंडूत २० धावा
समीर सोनवणे ११ चेंडूत १६ धावा.
अतुल भालेकर ३ षटकांत २ गडी बाद
श्रीराम पाटील, अनंत मुरगुडे, नितीन अबदार
प्रत्येकी १ गडी बाद.

कोल्हापूर १४. ४ षटकांत ११८ धावा
(४ गडी राखून विजयी )
मौक्तिक पाटील ३० चेंडूत ३९ धावा.
अतुल भालेकर २२ चेंडूत २७ धावा
श्रीराम पाटील ८ चेंडूत ११ धावा
समीर सोनावणे ३ गडी बाद
राहुल तोबरे, जयेश नरवडे पाटील, अखिल भालेकर प्रत्येकी १ गडी बाद.