September 8, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत पुरूष/महिला गटात सतेज संघ बाणेर, एम एच स्पोर्ट्स क्लब तर किशोर/किशोरी गटात श्रीकृष्ण संघ बाणेर, डॉ.पतंगराव कदम कबड्डी संघ पुणे जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे मानकरी

बाणेर :

बाणेर गावातील सिद्धिविनायक मित्रमंडळाने पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात सतेज संघ बाणेर ने प्रकाश तात्या बालवडकर संघाचा पराभव करून विजेतपद पटकावले.

 

महिला गटात अतीशय चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामना निर्धारित वेळेत समान गुणांवर संपला. पाच पाच चढाया मध्ये एम एच स्पोर्ट्स क्लब ने द्रोणा स्पोर्ट्स क्लबचा ३ गुणांनी पराभव करून विजेतेपद मिळविले. विजयी संघाकडून प्रतीक्षा करेकर, शोभा खैरे यांच्या चढाया तर अंकिता मोहोळ, अपूर्वा मुरकुटे यांच्या पकडीच्या जोरावर विजय मिळविला तर पराभूत संघाकडून श्रुतिका व्यवहारे, श्वेता माने आणि आचल पवार यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

किशोर गटात अंतिम सामन्यांमध्ये बाणेरच्या श्रीकृष्ण संघाने बालेवाडीच्या धर्मवीर संघावर मात करत अंतिम विजेतेपद मिळविले

किशोरी गटामध्ये पतंगराव कदम संघाने एम एच स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून अंतिम विजेतेपद मिळविले.

आपल्या मातीतील कबड्डी खेळाला वैभव मिळवून देण्यासाठी आणि खेळाडूंना उत्तम संधी देण्यासाठी बाणेर गावातील सिद्धिविनायक मित्रमंडळाने पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या. ३० सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात सुरु झालेल्या या निवड चाचणी स्पर्धेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून खुल्या पुरुष गटात ५१ आणि महिला गटात १६ संघांसह ८०४ खेळाडूंनी सहभाग घेतला तर किशोर मुले गटात ३७ तर मुलींच्या १४ अशा एकूण ६१२ खेळाडूंनी सहभाग घेतला.

अजिंक्यपद निवड चाचणीचे अंतिम सामने पार पडले. अंतिम सामन्यांचा थरार अनुभवायला आशियाई स्पर्धेत लाँग टेनिस मधे भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी आपल्या बाणेरची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, पुणे शहर सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप झांबरे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. शांताराम धोंडकर साहेब, चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे साहेब अशा मान्यवरांनी उपस्थिती लावून कबड्डी खेळाडूंचा उत्साह वाढवला.

यावेळी पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीपकर्णिक साहेब यांच्या हस्ते बाणेरची सुवर्णकन्या ऋतुजा भोसलेचा आशियाई स्पर्धेत लॉन टेनिसमधे सुवर्णपदक पटकावल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. तसेच अजिंक्यपद निवड चाचणीत आज झालेल्या चुरशीच्या सामन्यात विजयी संघांना अर्जुनवीर शांताराम जाधव, अर्जुनवीर शकुंतला खटावकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २०२३ अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :

किशोर_गट
१)प्रथम क्रमांक – श्रीकृष्ण कबड्डी संघ,बाणेर
२) द्वितीय क्रमांक – धर्मवीर कबड्डी संघ, बालेवाडी
३) तृतीय क्रमांक – बाणेर युवा संघ,बाणेर
४) चतुर्थ क्रमांक -सचिनभाऊ दोडके स्पोर्ट्स अकॅडमी

किशोरी_गट
१)प्रथम क्रमांक – डॉ.पतंगराव कदम कबड्डी संघ
२) द्वितीय क्रमांक – एम.एच, स्पोर्ट्स क्लब
३) तृतीय क्रमांक – तिरंगा स्पोर्ट्स क्लब
४) चतुर्थ क्रमांक – लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ संघ

वरिष्ठ_पुरुष_गट
१)प्रथम क्रमांक – सतेज संघ, बाणेर
२) द्वितीय क्रमांक – प्रकाश तात्या बालवडकर कबड्डी संघ,बालेवाडी
३) तृतीय क्रमांक – बदामी हौद
४) चतुर्थ क्रमांक – युवराज बेलदरे स्पोर्ट्स फाउंडेशन

वरिष्ठ_महिल_गट
१)प्रथम क्रमांक – एम एच स्पोर्ट्स क्लब
२) द्वितीय क्रमांक – द्रोणा स्पोर्टस क्लब
३) तृतीय क्रमांक -विजयमाला कबड्डी संघ
४) चतुर्थ क्रमांक -राजा शिवछत्रपती

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी मधे विजयी संघांचे आणि प्रशिक्षकांचे मनःपुर्वक अभिनंदन केले. तसेच सर्व नवोदित खेळाडूंना आणि पराभूत खेळाडू आणि संघांना पुढच्या स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी २०२३ स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेल्या सिद्धिविनायक मित्र मंडळ, सतेज संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाऊॅडेशनच्या सर्व सर्व आयोजकांचे, कार्यकर्त्यांचे आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे आभार आणि अभिनंदन चांदेरे यांनी केले.

सहा दिवस सुरू असलेल्या निवड चाचणी स्पर्धेत वरिष्ठ आणि किशोर गटातील खेळाडूंना मातीच्या मैदानावर उत्तम खेळ खेळण्यासाठी आयोजकांनी उत्तम नियोजन केले होते. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, पंच, सामनाधिकारी, गुण लेखक आदि सर्वांनी निपक्षपाती निर्णय दिल्याने सर्व स्पर्धा शांततेत आणि उत्साहात पार पडल्या.