September 12, 2024

Samrajya Ladha

ग्राफिटीच्या हौशी कलाकारांचे चित्र प्रदर्शन संपन्न…

कोथरूड :

ग्राफिटी चित्रकला क्लासेसमध्ये शिकणाऱ्या सर्व वयोगटातील हौशी कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह व कलादालन येथे जल्लोषात पार पडले. ग्राफिटी आर्ट इन्स्टिट्यूटचे संस्थापक व अध्यक्ष विशाल शिंदे व ज्येष्ठ नागरिक पुराणिक काका यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

 

वारली, मधुबली, स्थिरचित्र, निसर्गचित्र, व्यक्तीचित्र कॅलिग्राफी, कार्टून्स अशा वेगवेगळ्या विषयांवरील आणि पेन्सिल ड्रॉईंग, अॅक्रीलिक, वॉटर कलर, ड्राय आणि ऑइल पेस्टल अश्या विविध माध्यमातून तयार केली गेलेली, जवळपास सातशे चित्रे प्रदर्शनामध्ये लावण्यात आली होती. एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला.

औंध, बाणेर, वाकड, पिंपळे सौदागर, बावधन येथील ग्राफिटी शाखेमध्ये चित्रकलेचे प्रशिक्षण घेत असणाऱ्या बालगटापासून ते ज्येष्ठ कलाकारापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तीपत्र देण्यात आले. ग्राफिटी संस्थेच्या मुख्य संचालिका चित्रकार शितल शिंदे व शिल्पकार विजय दीक्षित आणि गिरीश खत्री यांच्या हस्ते अश्वत जयशंकर, अपूर्व राऊत, मायरा केतकर, हर्षित इंदुरकर, कणक राई, सृष्टी राऊत, शितल नाचणे, अर्जुन मगर, श्रावणी चाकणकर, वेदिका लाड मेधांश बहाद्दूर, द्रीष्टी प्रजापती, अन्वी कोळी, रुद्र जाधव, ईशानी भालेकर, एकांश पाटील, आराध्या आटोळे, अनिकेत देबोनाथ, ताश्री गांधी, ह्रिदांश कुमार, आयशा कनोजिया आणि अजून निवडक 50 विद्यार्थ्यांच्या चित्रांना पारितोषिक देण्यात आली.

प्रदर्शनात भाग घेतलेला प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या चित्रांमधून काही ना काही आपणास सांगू पाहत आहे, बोलू पाहत आहे, ती भाषा आपणाला अवगत व्हायला हवी. पालकांनी आपल्या मुलांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. याच उद्देशाने आम्ही हे प्रदर्शन गेले 17 वर्षापासून पुण्याच्या विविध भागांमध्ये भरवत आहोत, अशी माहिती चित्रकार विशाल शिंदे यांनी दिली.