November 21, 2024

Samrajya Ladha

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मेट्रो स्थानकांची पाहणी

पुणे :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

श्री. पाटील यांनी मेट्रो चालविणाऱ्या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

असा आहे मेट्रो मार्ग
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल सेवेबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे.