September 17, 2024

Samrajya Ladha

पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंचावरील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांची भेट घेतली. मंचावरील शरद पवार यांच्याजवळ आल्यानंतर मोदींनी स्वत: पुढाकार घेत हस्तोंदलन करण्यासाठी हात पुढं केला. यानंतर शरद पवार यांनी देखील प्रतिसाद दिला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना शरद पवार यांनी दोनवेळा मोदींची पाठ थोपटली.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी बोलताना ‘देशाला महान पुत्र देणाऱ्या या महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी प्रणाम करतो’, असे मराठीत बोलून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले “आज भारताचे गौरव आणि आदर्श लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. तसेच आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस आहे. लोकमान्य हे आपल्या देशाचे तिलक आहेत. तसेच अण्णाभाऊ यांचे योगदान खूप मोलाचे आहे. दोन्ही व्यक्तींना मी नमन करतो. आज पुण्याच्या पावनभुमीवर येण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. ही पुण्यभूमी शिवरायांची धरती आहे. या धरतीवर ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे. त्या भुमीवर मी आज आलो आहे.”

पुढे ते म्हणाले, “आज मला मिळालेला सन्मान अविस्मरणीय अनुभव आहे. आपल्या देशात काशी आणि पुणे इथे विद्वत्ता चिरंजीव आहे. पुण्यनगरी सन्मान हा माझा गौरव आहे. जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी देखील वाढते. आज टिळक यांचे नाव जोडलेला पुरस्कार मला मिळाला आहे. हा सन्मान मी देशवाशीयांना अर्पण करतो. देशाच्या सेवेसाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. ज्यांच्या नावात गंगाधर आहे, तो पुरस्कार मिळणं गौरवशाली आहे. या पुरस्काराची रक्कम मी गंगेसाठी अर्पण करतो.” यावेळी मोदींना पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे शरद पवार म्हणाले की, “टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जातील. या मान्यवरांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींचा समावेश झाला याचा सर्वांना आनंद झालं. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो

पुरस्कार सोहळा नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केले. यासोबतचं पुणे आणि पिंपरी- चिंचवड मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारादरम्यान वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मेट्रोसेवेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, राज्यपाल राजेश बैस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, डॉ. दीपक टिळक आदी उपस्थित होते.