September 17, 2024

Samrajya Ladha

साम्राज्य लढा बातमीची घेतली दखल, बाणेरमधील शिवरायांच्या स्मारकाजवळ कचरा टाकल्यास कठोर कारवाई करणार! पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

स्मारक परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी लोकसहभागातून स्वच्छतादूतची नियुक्ती

बाणेर :

बाणेर गावाची शोभा वाढवी यासाठी बाणेर नागरी पतसंस्था येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर कचरा टाकून, अस्वच्छता निर्माण केली जात असल्याचे निदर्शनास येत असून, कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. तसेच, सदर ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छतादूत देखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाणेर गावची शोभा वाढवी यासाठी बाणेर नागरी पतसंस्था परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र, सदर स्मारकाच्या समोरील मोकळ्या जागेवर रात्रीच्या सुमारास कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केली जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. आज कचरा टाकल्याची बाब समोर येताच नामदार पाटील यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर भागातील कचरा उचलण्याचे निर्देश दिले.

तसेच सदर ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहे. याशिवाय, या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी लोकसहभागातून एक कायमस्वरूपी स्वच्छतादूत देखील नियुक्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना आवाहन आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यामुळे त्यांचे कार्य नव्या पिढीला समजावे यासाठी बाणेर चौक येथे उभारण्यात आलेले स्मारक हे आपल्यासाठी मंदिर आहे. या मंदिराचं आणि परिसराचं पावित्र्य आणि स्वच्छता राखणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर भागात कचरा टाकून अस्वच्छता करु नये, तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील