November 21, 2024

Samrajya Ladha

स्मार्ट सिटी विकसित भाजी मंडई त्वरित सुरु करण्याची बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनची मागणी.

बालेवाडी :

बालेवाडी साई चौक येथे स्मार्ट सिटी पुणे यांनी ९३ लाख रुपये खर्च करून भाजी व फळे विकण्यासाठी अधिकृत ठिकाण म्हणून ओटा मार्केट तयार केले आहे. हे मार्केट लवकर सुरू करावे म्हणून बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या शिष्टमंडळाने या संदर्भात पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप यांची भेट घेऊन स्मार्ट सिटी विकसित भाजी मंडई त्वरित सुरु करण्याची मागणी केली.

सदर मार्केट हे गेले अनेक महिने पूर्ण होऊनही विनावापर पडून आहे. तसेच याकडे दुर्लक्ष होत असल्याने या ओटा मार्केट च्या जागेचा दारूड्यांकडून गैरवापर सुरु झाला आहे तसेच अस्वच्छता वाढली आहे. या संदर्भात बालेवाडी फेडरेशन च्या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी चे मुख्याधिकारी श्री. संजय कोलते यांची भेट घेतली असता, सदर मार्केट हे पुणे महानगरपालिकेने ताब्यात घ्यावे असे पत्र लिहिल्याचे सांगितले. या मार्केट मध्ये सीमा भिंत, पार्किंग व्यवस्था, सी.सी टी व्ही कॅमेरा, पथ दिवे इत्यादी कामे अजूनही प्रलंबित आहेत आणि निधी अभावी स्मार्ट सिटी ला ही कामे करणे शक्य नसल्याने पुणे महानगरपालिकेने ती पूर्ण करावीत असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन च्या शिष्टमंडळाने या संदर्भात पुणे महानगरपालिका उपायुक्त माधव जगताप यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बालेवाडी मधील नागरिकांना हक्काची मंडई यानिमित्ताने उपलब्ध होणार असून पालिकेने ती त्वरित सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशी विनंती केली.

माधव जगताप यांनी देखील या मंडई संदर्भातील स्मार्ट सिटी चे पत्र आणि प्रस्ताव संबंधित खात्याकडून लगेचच मागवला असून, मंडई लवकरात लवकर सुरु करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. पालिका आयुक्तांना देखील मागणीची प्रत फेडरेशनच्या शिष्टमंडळाने दिली.

या शिष्टमंडळात अमेय जगताप, परशुराम तारे, एस. ओ. माशाळकर आणि डॉ. सुधीर निखारे यांचा सहभाग होता.