September 20, 2024

Samrajya Ladha

‘ग्रंथालयांचे उदयोन्मुख परिवर्तन आणि सक्षमीकरण’ या विषयावरील  कार्यशाळा उत्साहात  संपन्न..

पुणे : 

बदलत्या काळानुसार ग्रंथालयांच्या कामकाजात सातत्याने परिवर्तन व सक्षमीकरण होणे गरजेचे आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले. शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात  ‘ग्रंथालयांचे उदयोन्मुख परिवर्तन आणि सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते.
 
डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क -डेलनेट, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स यांच्या सयुंक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथालय विभागाशी संबंधित ही कार्यशाळा ग्रंथपाल तसेच प्राध्यापक वर्गासाठी देखील अतिशय उपयुक्त असल्याचे डॉ. पराग काळकर यावेळी म्हणाले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर,डेलनेट च्या संचालिका डॉ.संगीता  कौल, सीओइपी ज्ञान संसाधन केंद्राच्या संचालिका डॉ.ए.जी.ठोसर ,कुलसचिव डॉ.डी.एन.सोनावणे, यशस्वी एज्युकेशन  सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.   

याप्रसंगी बोलताना डेलनेट च्या संचालिका डॉ.संगीता कौल यांनी डेलनेट संस्थेने ग्रंथालयांसाठी दिल्या जात असलेल्या विविध सेवा सुविधा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत प्रथम सत्रात डेलनेट पुणे विभागाचे समन्वयक रोहिदास राठोड,
बालानी इन्फोटेकच्या निकिता वंजारी यांची तर द्वितीय सत्रात डेलनेट दिल्ली मुख्यालयाचे खुशाल गिरी गोस्वामी,महाराष्ट्र ज्युकेशन सोसायटीच्या आयएमसीसी च्या ग्रंथपाल डॉ. मीनल ओक,सीओइपी ज्ञान संसाधन केंद्राच्या संचालिका डॉ. ए.जी.ठोसर, प्रसिद्ध  प्रेरणादायी व्याख्याते  विवेक डोबा यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी ग्रंथपाल श्रीमती अनिता देशपांडे यांनी केले. तर  पवन शर्माराजाराम कांबळे,महेन्द्र कांबळे यांनी या एकदिवशीय कार्यशाळेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य  केले. या कार्यशाळेत दीडशेहुन अधिक ग्रंथपाल व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.