November 22, 2024

Samrajya Ladha

‘एमआरपी’ च्या नावाखाली होणारी लूट थांबविण्याकरिता विशिष्ट पॉलिसी हवी : अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस

अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्ण महोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याचा समारोप

पुणे :

एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी किती रुपये खर्च झाले? त्या वस्तूचे उत्पादन मूल्य किती आहे? या संदर्भात कोणतीही कंपनी किंमत जाहीर करत नाही, परंतु त्या वस्तूची विक्री करताना मात्र ‘एमआरपी’ च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची लूट होते. ही लूट थांबण्यासाठी त्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी किती उत्पादन मूल्य लागले, याची माहिती ग्राहकांना मिळणे बंधनकारक असले पाहिजे. यासाठी एक विशिष्ट पॉलिसी तयार करणे गरजेचे आहे. उत्पादन मूल्यांसंदर्भात माहिती उत्पादन कंपन्यांनी जाहीर करावी. यासाठी एक जन आंदोलन उभे राहिले, तरच एमआरपीच्या नावाखाली होणारी ग्राहकांची पिळवणूक थांबेल, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ सोहळ्याची सांगता ओझर येथील श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा, आमदार अतुल बेनके, राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, विजय सागर, जयंती भाई कथोरिया, गजानन पांडे, मध्य महाराष्ट्र प्रांत प्रमुख बाळासाहेब औटी, प्रांताचे संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, प्रांत सचिव संदीप जंगम, प्रांत समन्वयक दीपक इरकल आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्व जिल्हा व तालुका स्तरीय पदाधिका-यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दोन दिवसीय कार्यक्रमात ग्राहक प्रबोधन दिंडी काढण्यात आली. ग्राहकांना विविध कायद्यांची माहिती देण्यात आली. जन आरोग्य अभियानाचे सह समन्वयक डॉ. अनंत फडके, पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड, महावितरण परिमंडळ पुणे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, राज्याचे सायबर सुरक्षा पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे, राज्य सेवा हक्क आयुक्त दिलीप शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दिनकर सबनीस म्हणाले, नफा मिळवण्यासाठी पर्यावरणाचा कितीही ऱ्हास झाला, तरी चालेल अशा प्रकारची मानसिकता आज अनेक उद्योगधंद्यांची झाली आहे. परंतु त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी मात्र आपण दुर्लक्षित करत आहोत. उद्योगांच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी हानी कमी करण्यासाठी ग्राहकांनी पर्यावरण पूरक वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, अशा प्रकारे पर्यावरण पूरक खरेदी करणारी प्रत्येक तालुक्यामध्ये किमान दहा कुटुंब निर्माण झाली तर त्यातून पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या उद्योगांवर अंकुश ठेवता येईल.

अतुल बेनके म्हणाले, आज प्रत्येक नागरिक ग्राहक आहे. नफेखोरीच्या नावाखाली अनेकांची वेगवेगळ्या प्रकारे दररोज फसवणूक होत असते, अशा ग्राहकांना त्यांच्या हक्कांच्या संदर्भात जागृत करून न्याय देण्याचे काम ग्राहक पंचायत गेल्या पन्नास वर्षांपासून काम करत आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही केवळ एक संस्था नव्हे तर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारी चळवळ आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही केवळ सर्वसामान्य माणसांनाच न्याय मिळवून देते असे नाही तर अनेक लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदारही या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असतात.