November 22, 2024

Samrajya Ladha

ग्राहकहित हे जन आंदोलन झाले पाहिजे : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा

पुणे :

ग्राहकांना काही पैशांचा फायदा करून देणे हेच केवळ अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य नाही, तर आपल्या हक्कासंबंधी ग्राहकांना जाणीव करून देणे आणि सजग ग्राहक निर्माण करणे, हे ग्राहक पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या हक्कासंबंधी ग्राहक सजग झाला तरच देश समृद्ध होऊ शकेल. ग्राहकहित हे राष्ट्रीय जन आंदोलन झाले पाहिजे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण भाई शहा यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ नारायण भाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ओझर येथील विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे, सुहास काणे, विजय सागर, जयंतीभाई कथोरिया, गजानन पांडे, महाराष्ट्र राज्य प्रांत प्रमुख बाळासाहेब औटी, धनंजय गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक आणि सुहास काणे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जगन्नाथ कवडे, उद्योजक संतोष चव्हाण आणि भालचंद्र बाळसराफ यांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ग्राहक बिंदू या स्मरणिकेचे आणि संदीप जंगम लिखित संवाद शास्त्र या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मध्य महाराष्ट्र प्रांताच्या वेबसाईटचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. सर्वाधिक ऑनलाईन सदस्य नोंदणी करणाऱ्या पुणे जिल्हा प्रांताचे यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी ग्राहक दिंडी देखील काढण्यात आली.

नारायणभाई शहा म्हणाले, ग्राहक पंचायतीचा जन्म हा वेदनेतून झाला आहे, ग्राहकांच्या वेदना समजून त्या दूर करण्यासाठी ग्राहक पंचायत पन्नास वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. या काळात करोडो ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले आहे. अशा सजग ग्राहकांमुळेच देशांमध्ये ग्राहक पंचायतीने एक चळवळ निर्माण केली आहे, ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवून त्याला राष्ट्रीय स्वरूप मिळवून देण्याची आज गरज आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, ग्राहक पंचायत ही व्यापारी किंवा नफ्यांच्या विरोधात नाही, तर ग्राहकांच्या हितासाठी आहे. देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमुळे निर्माण झाला, या कायद्यामुळे देशांमध्ये करोडो ग्राहकांना न्याय मिळवून देश समृद्ध करण्याचे काम ग्राहक पंचायतीने केले आहे. या चळवळीमध्ये अधिकाधिक तरुण कार्यकर्ते समाविष्ट होण्याची गरज आहे. ही चळवळ गाव पातळीवर पोहोचली तर गाव पातळीवर ग्राहकांवर होणारा अन्यायही दूर होऊ शकेल. देशातील ग्राहक अधिक सजग झाला तरच खऱ्या अर्थाने बिंदूमाधव जोशी यांचे ग्राहक हिताचे स्वप्न साकार होऊ शकेल.

अरुण देशपांडे म्हणाले, ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या कार्य संस्कृतीनुसार ग्राहक पंचायतीचे कार्य सुरू आहे. त्यांचे विचार समाजामध्ये खोलवर रुजवण्यासाठी ग्राहक पंचायत कार्यरत आहे. ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून बिंदूमाधव जोशी यांचे विचार आपण समाजामध्ये पोहोचवले तर खऱ्या अर्थाने ग्राहक राजा होऊ शकेल.

बाळासाहेब औटी म्हणाले, उत्पादनामध्ये विपुलता, वितरणामध्ये समानता आणि उपभोगामध्ये संयम हा बिंदूमाधव जोशी यांनी दिलेला विचार आजही ग्राहक पंचायत समाजाच्या तळागाळामध्ये पोहोचवत आहे. ग्राहक पंचायतीच्या पन्नास वर्षांच्या चळवळीमुळे करोडो ग्राहक जागृत झाले आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव झाली. ग्राहक पंचायत ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ आहे. ही चळवळ समाजाच्या तळागाळामध्ये पोहोचविण्यासाठी येत्या काळात गाव तेथे ग्राहक पंचायत ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. संदीप जंगम यांनी सूत्रसंचालन केले. रमेश टाकळकर यांनी आभार मानले.