September 17, 2024

Samrajya Ladha

बेरोजगारी, दुष्काळ या विषयावर विशेष अधिवेशन का बोलवले नाही – आ. रोहित पवार यांनी उपस्थित केला प्रश्न

पिंपरी :

सामान्य नागरिक अडचणीत असताना, बेरोजगारीच्या प्रश्नामुळे देशभरातील तरुण हवालदिल झालेले असताना, दुष्काळामुळे बळीराजा चिंताग्रस्त असताना संसदेचे विशेष अधिवेशन का बोलवले नाही ? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी पिंपरी येथे उपस्थित केला.    

सोमवारी (दि.१८) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नवनियुक्त अध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक अध्यक्ष इमरान शेख, माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, ज्येष्ठ नेते देवेंद्र तायडे, शिरीष जाधव, शहर प्रवक्ते माधव पाटील व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आ. रोहित पवार यांनी सांगितले की, भाजप हा कुटुंब आणि पक्ष फोडण्यास जबाबदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्ह बाबतचा वाद पक्ष फुटी मुळे जर निवडणूक आयोगा पुढे आणि न्यायालयात गेला, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह गोठविले तरी पक्ष शरद पवार यांच्या विचाराने पुढे जाईल. शरद पवार यांनी यापूर्वी विविध चिन्हांवर निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. निवडणूक आयोग हा भाजपाचे हातचे बाहुले आहे. चिन्ह बाबत निवडणूक आयोगाने जरी आमच्यावर अन्याय केला, तरी न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आम्ही पुरोगामी आहोत ते प्रतिगामी आहेत. शरद पवार यांच्या विचारांची साथ सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना पुढील निवडणुका कमळाच्या चिन्हावरच लढवाव्या लागतील. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही कर्जत, जामखेड येथूनच विधानसभा निवडणूक लढविणार आहे असेही आ. रोहित पवार यांनी सांगितले.  

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या नगरसेवकांनी स्वतःची ठेकेदारी वाचवण्यासाठी भाजपात जाण्याचा मार्ग पत्करला, बरं झालं ते गेले, आता त्यांना पुन्हा प्रवेश नाही असेही ठामपणे अजित पवार यांच्या बरोबर जाणाऱ्या माजी नगरसेवकांबाबत त्यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवड शहराचा झालेला विकास शरद पवार यांच्या दूरदृष्टी मुळे झाला आहे. केंद्रामध्ये यूपीएचे सरकार असताना जेएनएनयुआरएम चा भरघोस निधी शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरासाठी मिळवून दिला. त्यातूनच शहरात बीआरटीचे प्रशस्त मार्ग आणि रस्त्यांचे रुंदीकरण झाले. त्याच काळात मेट्रोला देखील मंजुरी यूपीए सरकारने दिली असल्याचेही आ. रोहित पवार यांनी सांगितले. मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याची भाजपामध्ये हिम्मत नाही, परंतु जेव्हा निवडणुका होतील तेव्हा सुज्ञ नागरिक भाजपाच्या विरोधात मतदान करतील असेही आ. रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.