November 22, 2024

Samrajya Ladha

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेवक वसाहतीमध्ये गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण…

पुणे विद्यापीठ :

गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीमध्ये घडली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दिनेश वाल्मिकी (वय 30), प्रतिक मल्हारी (वय 23, रा. दोघे रा. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय 25, रा. चिखलवाडी, ओैंध) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.या राड्याप्रकरणी कृष्णा किशोर तांबोळी (वय 35, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील चाळीत राहतात. गणेश उत्सव 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी विद्यापीठात सेवक चाळीत तयारी सुरू आहे. या साठी वर्गणी गोळा करण्याचे देखील काम सुरू आहे. दरम्यान, वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली. मात्र, तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.

याचा राग आल्याने आरोपी आणि फिर्यादी यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर हा वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. यात तांबोळी हे जखमी झाले. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.