July 30, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पुणे मनपा शाळा क्र. ११ जी, सोमेश्वरवाडी येथे “प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा

सोमेश्वरवाडी :

पुणे महानगरपालिकेच्या सोमेश्वरवाडी, पाषाण येथील मनपा शाळा क्र. ११ जी मध्ये आज, सोमवार, १६ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात “प्रवेशोत्सव” साजरा करण्यात आला. यावेळी पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. जयवंत दातार (भगवती आश्रम, जीवन कौशल्य विकास) यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. संगीता शिरगावकर, पर्यवेक्षिका यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात अभिनव पद्धतीने करण्यात आली. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांच्या पहिल्या पावलांचे ठसे उमटवून या सोहळ्याला एक वेगळीच किनार दिली. ‘छोटा भीम’ आणि बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम हे प्रवेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले, ज्यामुळे मुलांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.

यावेळी सेल्फी पॉइंट, भेट म्हणून देण्यात आलेले गिफ्ट कप आणि पेन्सिल, तसेच विविध खेळांच्या आणि कृतींच्या माध्यमातून मुलांना खूप आनंद मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा चौधरी, सर्व शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रवेशोत्सवामुळे शाळेत दाखल झालेल्या नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत झाले आणि पालकांमध्येही समाधानाचे वातावरण दिसून आले.