September 8, 2024

Samrajya Ladha

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सुरेश पोरवाल यांच्या तर्फे विद्यार्थिनींना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रक्षाबंधन निमित्त “बर्थडे नोट” भेट..

कोथरुड :

रक्षाबंधनाचा उत्सव हा केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता समाजातील बंधुभाव वाढण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा अशी भावना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.कार्यकर्त्यांनीही व्यक्तिगत महत्वकांक्षेच्या वर जाऊन परस्परांप्रती स्नेहभाव वृद्धिंगत करावा असेही ते म्हणाले.क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विद्यार्थिनींना त्यांच्या वाढदिवसाची तारीख असलेली नोट ( म्हणजेच दहा, वीस किंवा तत्सम रकमेच्या चलनी नोटेवर वाढदिवसाची तारीख असलेली ) भेट देण्याची कल्पना अभिनव असून मुलींनी ही नोट सांभाळून ठेवावी असेही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वैविध्यपूर्ण नोटांचे संग्राहक सुरेश पोरवाल, अशोक पोरवाल, ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष सतीश गायकवाड, माजी नगरसेवक जयंत भावे, प्रभाग समिती सदस्य ऍड.मिताली सावळेकर, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, कुलदीप सावळेकर, कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, प्रभाग सरचिटणीस ऍड. प्राची बगाटे, निलेश गरुडकर, बाळासाहेब धनवे, गिरीश खत्री, शैलेश मेंगडे, पतित पावन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळमकर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, पालक मनोज नायर, पं. दीनदयाळ उपाध्याय शाळेच्या मुख्याध्यापिका एलीझाबेथ काकडे, मराठी माध्यम च्या मुख्याध्यापक अनिता मूळे इ मान्यवर उपस्थित होते.

क्रिएटिव्ह फाउंडेशन नेहमीच वेगळ्या संकल्पना राबवत असते आणि त्यातूनच विद्यार्थिनींना आयुष्यभर जपून ठेवता येईल अशी भेट देण्याचे ठरविले, त्यानुसार आज 250 विद्यार्थिनींना व शिक्षकांना त्यांच्या वाढदिवसाची तारीख असलेली नोट भेट देत आहोत असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. ह्या उपक्रमासाठी मनपा ची ही शाळा निवडली कारण येथे शैक्षणिक दर्जा खासगी शाळांच्या बरोबरीचा असून येथे प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी असते असेही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

सध्या आपण बघतो की समाजात महिलांवर, अगदी लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होतं आहेत, अश्या परिस्थितीत रक्षाबंधन उत्सव हा प्रतिकात्मक न राहता त्याचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी परस्परांशी वागताना मैत्रीचा, नात्याचा आदर ठेवला पाहिजे असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. आज विद्यार्थिनींनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना राखी बांधली आहे, ते आपल्या कोथरूड साठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात विविध विकासकामे करून भेट देत असतात असेही त्या म्हणाल्या.

यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुरेश पोरवाल व सतीश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका एलीझाबेथ काकडे व अनिता मूळे यांनी चंद्रकांतदादांचा सत्कार केला.तसेच विद्यार्थिनींप्रमाणेच ना. चंद्रकांतदादा पाटील व संदीप खर्डेकर यांच्या वाढदिवसाच्या तारखेच्या एक रुपया ते पाचशे रुपयापर्यंतची फ्रेम श्री. सुरेश पोरवाल व अशोक पोरवाल यांनी भेट दिली.

विद्यार्थिनींनी मा. चंद्रकांतदादांना राखी बांधून त्यांच्याशी नाते निर्माण केले. सदर शाळेत विविध विकास कामांसाठी निधी देण्याची घोषणा ही चंद्रकांतदादांनी केली. त्यास विद्यार्थिनींनी जोरदार टाळ्यांची दाद दिली.