पुणे :
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन एकाच ठिकाणी एकूण ४०३ मराठमोळे फेटे बांधत भारत माता की जय या जयघोषात पुणे येथे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा हा विक्रम यावेळी झाला. महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनतर्फे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपरिक वेशभूषेत मोठया संख्येने सहभागी झालेल्या महिलांसह उपस्थितांनी राष्ट्रगीताचे समूहगान करीत राष्ट्रभक्तीचा संदेश देखील दिला. डेक्कन जवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे हा विक्रम करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या पुणे विभागाच्या प्रमुख चित्रा जैन यांनी असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलुरे यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी असोसिएशनच्या अपूर्वा पाटकर, विजया वाटेकर, गायत्री अकोलकर, सविता पवार, आरती कुटुंबे, प्रमुख पाहुण्या डॉ. प्रीती देशमुख आणि डॉ प्रेरणा बेराकी यांसह इतरही सदस्य उपस्थित होते.
चित्रा जैन म्हणाल्या, एकाच ठिकाणी सर्वाधिक फेटे बांधण्याचा विक्रम महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशने पुण्यामध्ये केला आहे. तब्बल ४०३ फेटे अवघ्या ५९ मिनिटांमध्ये बांधण्यात आले आहेत. यामाध्यमातून स्त्री सक्षमीकरणाचा संदेश देखील देण्यात आला. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यामुळे महिलांना एकत्रित करुन मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा आगळावेगळा उपक्रम होता.
अभिलाषा बेलुरे म्हणाल्या, प्रत्येकाला ११ ते १३ फूट लांबीचा फेटा घालण्यात आला. फेटे बांधण्याकरिता ६ पुरुष कारागिर होते. पुण्यासह मुंबई, सातारा,लातूर उस्मानाबाद, नगर यांसह विविध शहरांतून नागरिक सहभागी झाले होते. मराठमोळ्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासोबतच राष्ट्रभक्ती प्रत्येकामध्ये रुजावी, याकरिता हा विक्रम करण्यात आला. याशिवाय दोन दिवसीय राखी व फेस्टिव एक्झिबिशनचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
More Stories
माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजपचे पुणे लोकसभा उमेदवार…
क्रेडाई महाराष्ट्राचे प्रथमच व्हिएतनाम येथे आंतराराष्ट्रीय अधिवेशन संपन्न…
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पावर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढा; आपची मागणी