June 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, नरसिंग यादव व राहुल आवारे यांनी पटकावले सुवर्ण पदक

कॅनडा :

जगभरातील पोलिसांचे ऑलिंपिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी सुवर्णपदके आपल्या नावे केली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, दुसरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता राहुल आवारे यांनी आपापल्या वजनी गटात ही सुवर्णपदके जिंकली.

 

वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. विजय चौधरी यांचा पहिला सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी होता. या महत्त्वाच्या सामन्यात चौधरी यांनी साहोटाचा ११-०८ अशा फरकाने पराभव केला. अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.

विजय चौधरी हे जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे आहेत. ते पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन आणि इतर अनेक मानाच्या कुस्ती स्पर्धांच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.

‘काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच ठरवले होते की जागतिक पोलीस खेळांमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे. आता मेहनतीचे चीज झाले असून जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा आनंद आहे,’ – ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी