October 18, 2024

Samrajya Ladha

योगीराज पतसंस्थेचेअनुकरण इतर पतसंस्थांनी करावे…. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

बाणेर :

योगीराज पतसंस्था ही सामाजिक कार्या बरोबरच आर्थिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्यांच्याकडून आर्थिक प्रगती बरोबरच समाज हिताचे कामही कौतुकास्पद आहे, याचे अनुकरण इतर संस्थानी केले पाहिजे म्हणजे सहकार अधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. योगीराज पतसंस्थेच्या वतीने “योगीराज भूषण” व “योगीराज जीवन गौरव” पुरस्कार प्रदान सोहोळ्या प्रसंगी ते बोलत होते.

योगीराज पतसंस्थेच्या वतीने यावर्षीचा “योगीराज भूषण पुरस्कार” अधिक उद्योग समूहाचे विजय बोत्रे यांना तर स्वरा ग्रुप ऑफ हॉटेल्स चे संस्थापक रामदास मुरकुटे यांना “योगीराज जीवन गौरव” पुरस्कार कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 1 लाख रुपये व मानपत्र पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणार्‍या छत्रपती पुरस्कार विजेत्या कबड्डी खेळाडू स्नेहल शिंदे साखरे, प्रसिद्ध लेखिका सुनिता बोर्डे खडसे तसेच 40 देशात बुलेट वर नऊवारी साडी घालून प्रवास करून भारताची संस्कृती पोचवणारी भारत की बेटी रमाबाई लटपटे यांना प्रत्येकी 25 हजार निधी देऊन “योगीराज विशेष गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भंडारा डोंगरावर उभारण्यात येणाऱ्या तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी संस्थेच्या वतीने 5 लाख रुपये तसेच मुळशी तालुक्यात शेतकरी भवन उभारण्यासाठी 1 लाख रुपयांचा निधी याप्रसंगी देण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले की, परंतु सहकार क्षेत्रामध्ये योगीराज नागरी पतसंस्थेने या कठीण काळात सुद्धा आपले वेगळेपण व नाविन्य पण दाखवून दिले आहे. संस्थेने आर्थिक क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे अशीच प्रगती यापुढेही कायम राहील अशी आशा व्यक्त केली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याने त्यांनी सकाळीच संस्थेत येऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेची आर्थिक प्रगती व सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. तसेच सभासदांना यावर्षी 15% लाभांश जाहीर केला. पतसंस्थेच्या माध्यमातून भंडारा डोंगरावर उभ्या राहणाऱ्या मंदिरासाठी गेल्या वर्षी 5 लाख रूपयांची देणगी दिली होती यावर्षीही देत आहोत तरी मंदिराचे काम पूर्ण होईपर्यंत देणगी देण्याचे काम चालू राहील असेही यावेळी सांगितले.

याप्रसंगी बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, आमदार भीमराव तापकीर, मा. आमदार विलास लांडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, मा. नगरसेवक अमोल बालवडकर, सनी निम्हण, दत्ता बहिरट,धनंजय भालेकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत माडगुळकर, बाळासाहेब काशिद, सहकार भारतीचे मुकुंद तापकीर, एव्हरेस्ट वीर सुविधा कडलग, धर्मवीर संभाजी बँकेचे अध्यक्ष बाबूराव शितोळे, पुरंदर पंचायत समिती माजी सभापती रमेश जाधव, अशोक मुरकुटे, विश्वास जोगदंड, बबन जोगदंड, कालिदास मोरे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर तसेच संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
आलेल्या सर्वांचे आभार संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी मानले.