बाणेर :
वसुंधरा अभियान, बाणेर या संस्थेने आयोजित केलेल्या तेराव्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल २६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या रक्तदानामुळे हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शिबिर यशस्वी झाले असून, संस्थेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे रक्तदान शिबिर ठरले आहे.
वसुंधरा अभियान बाणेर ही संस्था २००६ पासून तुकाई टेकडीवर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. पर्यावरण रक्षणासोबतच ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवते. संस्थेने आतापर्यंत तुकाई टेकडीवर ४८ हजार वृक्षांचे जंगल उभे केले आहे, ज्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने संस्थेला ‘श्री शिवछत्रपती वनश्री’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
या सामाजिक कार्याचाच भाग म्हणून वसुंधरा अभियान दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करते. यावर्षी आयोजित शिबिराचे उद्घाटन रक्तदान चळवळीत नेहमीच अग्रेसर असणारे मा. पर्णल देखने, १७८ वेळा रक्तदान करणारे श्री राम बांगड आणि माजी सैनिक चंदू सुतार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी वसुंधरा अभियानाच्या कार्याचे कौतुक केले आणि रक्तदानाचे महत्त्व विशद केले.
या रक्तदान शिबिराला सुमारे ४०० सदस्यांनी भेट देऊन वसुंधरा अभियानाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.


More Stories
पाषाण कार्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन
परिहार चौक परिसरातील अतिक्रमणावर कारवाईचे आश्वासन; सनी निम्हण यांचा पाठपुरावा
पेरिविंकल स्कूलमध्ये ‘योगा फॉर हार्मनी, हेल्थ अँड हॅपिनेस’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा