August 6, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*बावधन शाखेतील पेरीविंकल विद्यालयात योग आणि संगीताचा अनोखा संगम!!!* *झुंबाच्या तालावर विद्यार्थ्यांनी गिरवले योगसाधनेचे संगीतमय धडे!!!*

*”योग साधना ही निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” — योगतज्ज्ञ सुहास फडके*

बावधन, 21 जून 2026 :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधन येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिनाचे औचित्य साधून योग, संगीत आणि फिटनेस यांचा सुरेख संगम घडवून आणणारा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या संकल्पनेतून “म्युझिकल योगा” अर्थात झुंबा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योगसाधना, प्राणायाम आणि संगीताच्या तालावर करण्यात आलेल्या व्यायामामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व उपस्थित मान्यवरांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वतीच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, प्रमुख पाहुणे योगतज्ज्ञ श्री. सुहास फडके, भारत विकास परिषदेचे कार्यकर्ते श्री. शामकांत उकिडवे, श्री. श्रीधर अनघळ तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारी योग प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.

प्रमुख पाहुणे योगतज्ज्ञ श्री. सुहास फडके यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत व प्रसन्न राहते, एकाग्रता वाढते आणि मन व शरीर या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता विकसित होते. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने दररोज योगासने आणि प्राणायामाचा सराव करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देताना विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने सहभाग नोंदविला. सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे योगासने व प्राणायाम करून निरोगी जीवनशैलीचा संकल्प केला.

आंतरराष्ट्रीय संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या म्युझिकल योगा अर्थात झुंबा सत्राने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनीही झुंबामध्ये सहभाग घेतला. संगीताच्या तालावर करण्यात आलेल्या या व्यायाम प्रकारामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला.

या कार्यक्रमात शाळेचे क्रीडा शिक्षक व झुंबा प्रशिक्षक श्री. सूरज साठे यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झुंबा सत्र घेतले. त्यांच्या जोशपूर्ण व ऊर्जादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी, शिक्षक तसेच उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. झुंबाच्या विविध स्टेप्स आणि लयबद्ध हालचालींमुळे उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली आणि उपस्थितांना ताजेतवाने व आनंदी अनुभव मिळाला.
झुंबा सत्रानंतर विशेष ध्यानधारणेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे संगीत शिक्षक श्री. अक्षय कबाडे यांनी हार्मोनियमवर अत्यंत मधुर, शांत आणि सुरेल ताना सादर करत ध्यानासाठी प्रसन्न वातावरण निर्माण केले. त्यांच्या सुरेल संगीताच्या साथीने विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी ध्यानाचा अनुभव घेतला. या ध्यानसाधनेमुळे संपूर्ण परिसर शांतता, सकारात्मकता आणि अध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला. योग, संगीत आणि ध्यान यांचा सुंदर संगम उपस्थितांना अंतर्मनाशी जोडणारा ठरला.

यावेळी आपल्या मनोगतात मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांनी सांगितले की, “योग आणि संगीत यांचा सुंदर मिलाप म्हणजे म्युझिकल योगा. संगीताच्या तालावर व्यायाम किंवा योगाभ्यास केल्यास मन प्रसन्न राहते, शरीर अधिक सक्रिय होते आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. आजच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक योगासोबत आधुनिक फिटनेस पद्धतींची ओळख करून देणे गरजेचे आहे. झुंबा हा केवळ नृत्य प्रकार नसून Mind and Body Fitness साठी अत्यंत प्रभावी व्यायाम पद्धती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित योगासोबत शारीरिक तंदुरुस्ती जपणाऱ्या अशा उपक्रमांमध्येही सहभागी व्हावे.”

संचालिका सौ. रेखा बांदल यांनी विद्यार्थ्यांना योगामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक फायदे सांगून नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. त्यांनी योग ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली अमूल्य देणगी असल्याचे नमूद केले.

योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष खेळांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे योगामुळे शरीर, मन आणि विचारांवर नियंत्रण कसे ठेवता येते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल व कु. शिवानी बांदल यांच्या प्रेरणेतून करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व कुशल मार्गदर्शनाने कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. सर्व पर्यवेक्षक, शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभाग प्रमुख सौ. सायली गायकवाड यांनी अत्यंत प्रभावी प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले. आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

योग, प्राणायाम, संगीत, ध्यान आणि फिटनेस यांचा सुंदर संगम घडवून विद्यार्थ्यांना निरोगी, आनंदी आणि सकारात्मक जीवनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

You may have missed