सूस :
चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सूस शाखेच्या भव्य पटांगणात दिवाळी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘स्वरसंध्या – एक शाम खुशियों के नाम’ या सुरेल संगीत मैफलीसह संस्थेच्या शिक्षकवृंदासाठी आयोजित करण्यात आलेले दिवाळी बोनस वितरण हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. संगीत, संस्कृती, आनंद आणि कृतज्ञतेचा सुंदर संगम साधणाऱ्या या उत्सवाने संपूर्ण पेरीविंकल परिवाराला एकत्र आणले.
बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, समन्वयक, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकर्षक रोषणाई आणि उत्सवी सजावटीमुळे संपूर्ण परिसर दिवाळीच्या आनंदाने उजळून निघाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ज्ञान, कला आणि संस्कृतीच्या प्रतीक असलेल्या देवी सरस्वतीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते ‘दिवाळी ईव्ह २०२६’ चे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी इंडियन आयडियल फेम सुरेश कदम, प्रसिद्ध गायिका प्रांजली बर्वे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र बांदल सर, संचालिका सौ. रेखा बांदल, संचालिका कु. शिवानी बांदल, संचालक श्री. यश बांदल, श्री. संदीप ढमढेरे, पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व शाखांच्या प्रमुख व मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, समन्वयक तसेच इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ‘स्वरसंध्या – गाण्यांची मैफिल’. इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायक श्री. सुरेश कदम आणि गायिका प्रांजली बर्वे यांनी आपल्या सुरेल गायनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. विविध लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणातून त्यांनी संगीताचे बहारदार रंग उलगडले. सुमधुर स्वर, सुरेल चाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यांमुळे संपूर्ण परिसर संगीतमय झाला. उपस्थितांनी या अविस्मरणीय संगीत मैफलीचा मनमुराद आनंद लुटला.
यंदाच्या दिवाळी उत्सवाचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या शिक्षकवृंदासाठी करण्यात आलेले दिवाळी बोनस वितरण. संस्थेच्या जडणघडणीत आणि शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांचे योगदान अनमोल असून, त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत दिवाळीच्या निमित्ताने बोनस प्रदान करण्यात आला. शिक्षकांच्या मेहनतीचा सन्मान, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता आणि संस्थेच्या परिवारभावनेचे प्रतीक म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. व्यवस्थापनाकडून मिळालेल्या या आनंददायी भेटीमुळे शिक्षकांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
उत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे विविध व्यावसायिक आणि कलात्मक स्टॉल्सची आकर्षक मांडणी. कपडे, दागिने, हस्तकला, चित्रकला साहित्य, सणासुदीच्या वस्तू आणि विविध उत्पादनांच्या स्टॉल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून स्थानिक व्यावसायिक, लघुउद्योजक आणि कलावंतांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भेटवस्तू वितरणाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला. शेवटी आभार प्रदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशकंदील आकाशात सोडण्यात आले. प्रकाश, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात या सोहळ्याची संस्मरणीय सांगता झाली.
या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व शाखांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. विविध शाखांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. दैनंदिन शैक्षणिक जबाबदाऱ्यांपलीकडे जाऊन परस्परांशी संवाद साधणे, स्नेहबंध दृढ करणे आणि एकत्रितपणे सण साजरा करणे, या दृष्टीने हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला. संस्थेची एकात्मता, कर्मचारी कल्याण आणि परस्परांतील जिव्हाळा यांचे दर्शन या उत्सवातून घडले.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल आणि संचालिका कु. शिवानी बांदल तसेच सर्व शाखांच्या प्रमुख प्राचार्या सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी सर्व शाखांच्या प्रमुख व मुख्याध्यापिका सौ. निर्मल पंडित व उपमुख्याध्यापिका सौ. योगिता ढाणे यांच्या मार्गदर्शनाने समन्वयक श्री. सचिन खोडके पर्यवेक्षिका सौ. नेहा माळवदे यांच्या कला शिक्षक शिवराज कदम,श्री. ज्ञानेश्वर मोरे सर , कृष्णा अंभोरे, इव्हेंट हेड आदिती कासार व सारिका गाढवे यांच्या सहकार्याने करण्यात आले होते . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ला पाटील आणि सचिन खोडके यांनी केले.
संगीताच्या सुरेल मैफलीतून सांस्कृतिक आनंदाची अनुभूती, शिक्षकांना दिवाळी बोनसच्या माध्यमातून मिळालेला सन्मान आणि सर्व शाखांतील शिक्षकांच्या सहभागातून दृढ झालेले स्नेहबंध अशा बहुआयामी वैशिष्ट्यांनी यंदाचा पेरीविंकल दिवाळी उत्सव संस्मरणीय ठरला. केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता संस्थेच्या एकात्मतेचा, कृतज्ञतेचा आणि सामूहिक आनंदाचा संदेश देणारा हा सोहळा पेरीविंकल परिवारासाठी एक अविस्मरणीय पर्व ठरला.



More Stories
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*