June 20, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

*बावधन च्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोनक टोयोटाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न!!!*

बावधन :

चैतन्य विद्या प्रतिष्ठान संचलित पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, बावधन येथे सोनक टोयोटा यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हरित जीवनशैलीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निसर्गसंवर्धनाची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. वाढते प्रदूषण, वृक्षतोड आणि बदलते हवामान यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. यानंतर सोनक टोयोटाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध प्रकारची औषधी व शोभेची रोपे भेट देण्यात आली.

यावेळी प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व सोनक टोयोटाच्या प्रतिनिधींच्या सहाय्याने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले. लहान वयातच पर्यावरणाविषयी प्रेम आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम विशेष आकर्षणाचा ठरला. विद्यार्थ्यांनी रोपांना नियमित पाणी घालून त्यांचे संगोपन करण्याची शपथही घेतली.

पर्यावरण जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “माझे झाड – माझी जबाबदारी”, “हरित पृथ्वी – सुरक्षित भविष्य”, “पाणी वाचवा”, “पृथ्वीचे संरक्षण” अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने चित्रे साकारली. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचे संदेश आपल्या चित्रांमधून प्रभावीपणे मांडले.

स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांची निवड करून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सोनक टोयोटा कडून गौरविण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेट म्हणून पेन्सिली प्रदान करण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला.

या प्रसंगी शाळेचे संस्थापक मा. श्री. राजेंद्र बांदल यांनी विद्यार्थ्यांनी निसर्गाशी घट्ट नाते जोडून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करत पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रेरित केले.

तर वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येकाने लावलेल्या झाडाचे संगोपन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” असा संदेश सर्वांना दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षक शिक्षकवृंद, सोनक टोयोटाचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी शाळेचे संचालक श्री यशराज बांदल यांचे विशेष सहकार्य लाभले.

पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. उपस्थितांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.🌱🌍🌳