बाणेर :
बाणेर येथे श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली श्री भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली. ३० एप्रिल ते २ मे या दरम्यान चाललेल्या या तीन दिवसीय उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील कार्यक्रमांचा समावेश होता, ज्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी पर्वणी ठरली.
अक्षय तृतीयेच्या शुभदिनी, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत श्री भैरवनाथ देवाची पालखी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण बाणेर गावठाणाची परिक्रमा करण्यात आली. या धार्मिक सोहळ्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
१ मे रोजी सायंकाळी सावरकर उद्यान येथे प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तरुणाई आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
उत्सवाच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी, २ मे रोजी सावरकर उद्यान येथे भव्य कुस्तीचा आखाडा रंगला. या आखाड्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ, सिकंदर शेख, हर्षवर्धन सादगीर, पृथ्वीराज पाटील, उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर, शैलेश शेळके आणि हिंद केसरी अजय कातीयाल यांसारख्या नामांकित मल्लांनी आपल्या चित्तथरारक कुस्त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच, हिंद केसरी पैलवान हरीश दहिया तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू आणि गोल्ड मेडलिस्ट यांनी देखील कुस्ती खेळली. महिला कुस्तीपटू सोनाली मंडलिक आणि सोनिया हुड्डा यांच्या विशेष कुस्त्यांनी महिला प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या भव्य सोहळ्याला आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी महापौर आणि अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर) श्री प्रशांतदादा जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे, माजी नगरसेवक अमोलभैया बालवडकर, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्री गणेशजी कळमकर, प्रकाश तात्या बालवडकर आणि बाणेर पोलीस स्टेशनचे पीआय सावंत साहेब यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
संपूर्ण उत्सवाचे यशस्वी नियोजन श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री राहुल पारखे, सचिव श्री अनिकेत मुरुकुटे, हिशोब तपासनीस श्री मंगेश मुरुकुटे आणि विश्वस्त श्री प्रवीण शिंदे यांच्यासह ग्रामस्थांच्या समितीने केले. या समितीत श्री राजेश प विधाते, विशाल विधाते, जीवन चाकणकर, श्री प्रशांत पारखे, श्री जयश मुरकुटे, श्री संदीप कळमकर, श्री हेमंत मुरुकुटे, श्री प्रशांत ताम्हाणे, संग्राम मुरुकुटे, शहाजी मुरुकुटे, सुधाकर धनकुडे, बाळा गरुड, रोहित विधाते, भाऊ पारखे, दिपक शिंदे आणि राहुल ननावरे या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता.
कुस्तीचा आखाडा सुरू असताना ग्रामस्थांनी हिंद कुमार केसरी पैलवान विराज रानवाडे यांचा जाहीर सत्कार केला. यासोबतच, परिसरातील पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या वसुंधरा अभियान आणि रामनदी स्वच्छता अभियान या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या कुस्ती आखाड्याचे समालोचन श्री हंगेश्वर धायगुडे यांनी आपल्या प्रभावी वाणीने केले. त्यांनी महाराष्ट्राच्या लाल मातीचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर मांडून कार्यक्रमात रंगत भरली.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले