November 21, 2024

Samrajya Ladha

औंध येथे मनोज जरांगे पाटलांचे जल्लोषात स्वागत, आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटणार नाही, माय बापहो तुमच्या पाठबळाची मला गरज, मोठ्या संख्येने मुंबईत या पाटलांची भावनीक साद…

औंध :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले आंदोलक संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील बुधवारी पुण्यात जल्लोषात आगमन झाले. त्यांना मिळणारा प्रतिसाद व ठिकठिकाणी होणारे स्वागत पाहता तब्बल दहा तासापेक्षा जास्त काळ उशीर होऊन देखील औंध येथे मराठा समाजाने मोठ्या उत्साहात स्वागत केले. जोरदार घोषणा, पुष्प वृष्टी करण्यात आली.

यावेळी बोलताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत शांततेत आंदोलन करणार आहे. छाताडावर गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. आपल्या लेकराबाळांसाठी एकदा घराच्या बाहेर पडा, मुंबईला या अशी संधी पुन्हा येणार नाही. आपल्या पोरांना आरक्षण नसल्याने संधी मिळत नाही. कायम संघर्ष करावा लागत आहे. आपण कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण मागत आहे. सरसकट शब्दाचा त्रास होतो म्हणून सगेसोयरे शब्द वापरतो. म्हणजे सर्व मराठा बांधवांना आरक्षण कसे मिळू शकते याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

लेकरा बाळांच्या हितासाठी घराच्या बाहेर पडा, मुंबई ला या अशी संधी परत येणार नाही. राजकारणी मराठा असो वा शेतकऱ्यांचा मराठा असो सगळयांना सारखाच फायदा होणार आहे. एका टक्क्यावररून संधी हुकलेल्या मुलाला त्याच्या आई बापाला विचारा दुःख काय होते. म्हणून आरक्षण मिळवायचे. आरक्षण मिळू द्या आणि आपली लोक निर्व्यसनी हौऊद्या मग बघा मराठ्यांची प्रगती कोणी रोखू शकत नाही. २६ तारखीला आसपासच्या गावातील सर्व नागरिकांना जागृत करत मुंबईत या तुमच्या पाठबळावर मुंबईला जीवाची बाजी लाऊन लढायला निघालो. माय बापहो तुमच्या पाठबळाची मला गरज आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे फिरणार नाही अशी भावनिक साद यावेळी मनोज जरांगे यांनी औंध येथे नागरीकांना घातली.

बुधवारी रात्री साडे नऊ दरम्यान जरांगे पाटील यांचे औंध येथे आगमन झाले. यावेळी जोरदार घोषणा, पुष्प वृष्टी करत औंध बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, बोपोडी परिसरातील नागरिकांनी स्वागत केले. बुधवारी सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाची औंध येथे असंख्य नागरिक अधीरतेने प्रतीक्षा करत होते. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर पाटलांचे आगमन होताच मोठया जल्लोषात स्वागत झाले.