September 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर व अध्यक्ष, वामा वुमेन्स क्लब) यांच्या वतीने ‘सावतामाळी महिला भजनी मंडळ, बाणेर’ यांचा सत्कार

बाणेर :

“जागर स्त्रीशक्तीचा – सन्मान नारीशक्तीचा” या नवरात्रात चालू केलेल्या विशेष उपक्रमांतर्गत समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर व वामा वुमेन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावतामाळी महिला भजनी मंडळ, बाणेर यांचा विशेष सन्मान सौ. पूनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आला.

बाणेरमधील सावतामाळी महिला भजनी मंडळ हे स्त्रियांनी उभारलेले एक अद्वितीय मंडळ आहे. या मंडळाने केवळ भक्तिगीतांचा प्रसार केला नाही, तर समाजातील एकोपा, संस्कार आणि सकारात्मकता यांचा संदेश जनमानसात पोहोचवला आहे. या मंडळाने महिलांना आत्मविश्वास दिला, त्यांना समाजात नवे स्थान निर्माण करण्याची प्रेरणा दिली.

नवरात्र हा देवीच्या शक्तीचे प्रतीक मानला जाणारा उत्सव. या मंगलमय काळात नारीशक्तीच्या योगदानाला सलाम करत, सावतामाळी महिला भजनी मंडळाचा सत्कार सोहळा पार पडला. यामध्ये मंडळातील सर्व महिलांना पुष्पगुच्छ, मानचिन्ह व अभिनंदनपत्र देऊन गौरविण्यात आले.

समाजातील महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे कार्य पुढे यावे व इतरांसाठी ते प्रेरणास्थान ठरावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “भजन हीच खरी साधना, आणि साधना हीच खरी सेवा” हा संदेश देत या मंडळाने केलेले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे.

या प्रसंगी बोलताना सौ. पूनम विशाल विधाते (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर व अध्यक्ष, वामा वुमेन्स क्लब) म्हणाल्या – “नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर आहे. सावतामाळी महिला भजनी मंडळाने समाजाला दिलेली दिशा आणि प्रेरणा ही खरंतर प्रत्येकासाठी आदर्शवत आहे. महिलांनी भक्ती, संस्कार व समाजसेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून जे कार्य केले आहे, त्याचे कौतुक शब्दात मावणार नाही. अशा कार्यकर्त्या महिला समाजासाठी दीपस्तंभ ठरतात.”

या सत्कार सोहळ्याला स्थानिक नागरिक, कार्यकर्ते व विविध महिला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नवरात्राच्या पावन वातावरणात झालेला हा कार्यक्रम स्त्रीशक्तीच्या सन्मानाचा एक संस्मरणीय सोहळा ठरला.

 

You may have missed