November 21, 2024

Samrajya Ladha

बालेवाडीत ग्राहक मार्गदर्शन केंद्राची स्थापना,अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम…

बालेवाडी :

अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे ग्राहक मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली. प्रत्येक नागरिक हा प्रथम ग्राहक असतो. त्याला आपल्या हक्कांची जाणीव व्हावी आणि वस्तु वा सेवा विकत घेतांना काही फसगत झाली तर कोठे दाद मागावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विलास लेले यांचे हस्ते मार्गदर्शन केंद्राचे उद‌्घाटन झाले.

आपल्या भाषणात विलास लेले म्हणाले “ऑनलाईन च्या जमान्यात काही फसगत झाल्यास कुणाशी संपर्क करावा याबद्दल माहिती उपलब्ध नसते. एमआरपी विषयी नियम नसल्याने मन मानेल तशा किंमती लिहिल्या जातात आणि त्यावर मोठी सुट दिली जाते. यामुळे ग्राहकांना खरी किंमत काय कळत नाही. अनावश्यक खरेदी केली जाते. हे प्रकारे ग्राहकांचे शोषण आहे. विलास लेले यांनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांचे उद्बोधन केले.

गृह खरेदी विषयी उपस्थितांनी प्रश्न विचारले.त्याला ग्राहक पंचायतीचे सचिव विजय सगर यांनी समर्पक उत्तरे दिली.

फेडरेशनचे चेअरमन रमेश रोकडे यांनी “जागो ग्राहक जागो” हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी फेडरेशनने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. तर फेडरेशनचे व्हाईस चेअरमन अशोक नवल म्हणाले, “बालेवाडीतील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध असून हा प्रकल्प त्याचाच एक भाग आहे.”

डॉ.ॲड.वसुंधरा पाटील ग्राहक मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुख असुन त्यांना सहाय्यक म्हणून फेडरेशनच्या ईतर चार महिला सदस्य काम पहाणार आहेत. ग्राहक मार्गदर्शन केंद्राविषयी माहिती वसुंधरा पाटील यांनी दिली. पाहुण्यांचे स्वागत आदीती पायस समुद्र यांनी केले तर ॲड माशाळकर यांनी आभार मानले.

बालेवाडी येथील एलाईट एंपायर सोसायटीत हे केंद्र असेल व प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शनिवारी दुपारी चार ते सहा या वेळेत सर्वांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. कार्यक्रमाला दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे अवाहन करण्यात येत आहे.