October 18, 2024

Samrajya Ladha

पाषाण सुस रस्त्यावरील पुणे महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नांदे गावात आणल्यास तीव्र आंदोलन करू : निकिता रानवडे(सरपंच, नांदे ग्रामपंचायत)

नांदे :

पाषाण सुस रस्त्यावरील पुणे महापालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नांदे (ता. मुळशी) येथील गायरान जागेवर प्रस्तावित असून या प्रकल्पाला तीव्र विरोध करत नांदे ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, अशी माहिती सरपंच निकिता रानवडे, माजी सरपंच प्रशांत रानवडे, तसेच ग्रामस्थांनी दिली.

नांदे येथील गायरान क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरात बागायती शेती, तसेच लोकवस्तीही आहे. या गायरान क्षेत्रालगत नैसर्गिक ओढा असून, तो मुळा नदीला मिळतो. नांदे गावाला पिण्याच्या पाण्यासाठीची विहीर याच मुळा नदीच्या काठावर असून, त्या ठिकाणी हा ओढा मिळालेला आहे. या प्रकल्पामुळे नदीचे पाणी दूषित होऊन आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत. शेतीच्या पिकांना हानी होणार आहे. जनावरे व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण होणार आहे.

महानगरपालिकेचा कचरा आमच्या ग्रामीण भागातील नांदे परिसरात आणून लोकांच्या आरोग्याशी शासन खेळणार आहे काय ? हा प्रकल्प शासनाने रद्द करून अन्य ठिकाणी त्याचे नियोजन करावे, अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत : निकिता रानवडे, सरपंच, नांदे ग्रामपंचायत

या गायरान जागेमध्ये सध्या मुळशी प्रादेशिक पाणी योजनेसाठीची साठवण टाकी उभारली जात असून, ते काम ऐंशी टक्के पूर्ण होत आलेले आहे. नांदे गावाला मर्यादित गायरान क्षेत्र असून, भविष्यात या जागेवर गावच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याच्या झाल्यास त्यासाठी स्वतंत्र क्षेत्र उपलब्ध नाही. याच गायरान जागेवर आरोग्यकेंद्र, पिण्याच्या पाण्यासाठी विहीर, शाळा, सार्वजनिक उद्यान, व्यायामशाळा तसेच अन्य उपक्रमांच्या बांधकामांसाठी ग्रामपंचायतीने शासनाकडे दोन वर्षांपूर्वी मागणी केली होती. ती अद्याप पूर्ण केलेली नाही. या गायरान जागेपासूनच काही अंतरावर सिंबायोसिस, आयएसबीएम, ध्रुव आदी शैक्षणिक संस्था, तसेच लुपीन ही औषध निर्माण कंपनी असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरा प्रकल्प नांदे गावाला हलवून आम्हाला कशासाठी त्रास दिला जातोय पुणे महापालिकेत नव्याने समावेश केलेल्या गावांपैकी ज्या गावांना गायरान क्षेत्र आहे, त्यातीलच एखाद्या गावात प्रकल्पासाठी विचार करावा. आमच्या गावामध्ये हा प्रकल्प आणल्यास आमचा त्यास विरोध असून आम्ही आंदोलन करू : माजी सरपंच प्रशांत रानवडे