September 8, 2024

Samrajya Ladha

किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम,नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

कोथरुड :

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे प्रेरणा देणारे आहेत. लहान मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजावेत, त्यांना शिवरायांचे कार्य समजावे; यासाठी आगामी काळात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना गडकोट किल्ल्यांची मोहिम आयोजित केली जाईल, अशी घोषणा नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. एका चिमुकल्याच्या मागणीनुसार मकरसंक्रांतीचे औचित्य साधून लहान मुलांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाईल; असेही त्यांनी यावेळी आश्वस्त केले.

 

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पक्ष कोथरुड मतदारसंघाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे दिवाळीमध्ये किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता.‌ या कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते.यावेळी ह्या स्पर्धेचे यशस्वी नियोजन करणारे सूचित देशपांडे यांना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या हातातील घड्याळ भेट दिले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे,भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तर अध्यक्ष सचिन पाषाणकर, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, वासंती जाधव, नगरसेवक दीपक पोटे, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, सचिन दळवी, अश्विनी ढमाले यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, किल्ला बनवा स्पर्धेतील सर्व स्पर्धक उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे शिवरायांचे विचार बाल मनावर रुजावेत, त्यांना शिवरायांच्या कार्याची ओळख व्हावी; यासाठी किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांना आगामी काळात गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा केली.

यावेळी उपस्थित लहान मुलांनी मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्याचा आग्रह नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर धरला. त्याला नामदार पाटील यांनी समर्थन दर्शवत मकर संक्रांतीला कोथरुड मध्ये पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा केली. यासाठी इच्छुकांनी भाजपा कोथरुड मंडल कार्यालय आणि आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की, नामदार चंद्रकांतदादा पाटील हे प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काम करणारे नेतृत्व आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने नामदार पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. पुणे शहर हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य स्मरणात रहाव्यात. त्यामुळे बाल मनावर संस्कार होतात, यासाठी आयोजित किल्ले बनवा स्पर्धा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी लहान मुलांकडून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत डॉ संदीप बुटाला यांनी केले. प्रास्ताविक सुचित देशपांडे यांनी केले. सूत्र संचालन राज तांबोळी यांनी केले.