पुणे :
प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपारिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे. अवघ्या १० मिनिटात कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथावर उपचार करणारे ‘रिझूम थेरपी’ तंत्रज्ञान पुण्यातील बाणेरस्थित युरोकुल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे. हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणले आहे, याचा आनंद वाटतो, असे ‘युरोकुल’चे संस्थापक व युरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, प्रख्यात युरॉलॉजिस्ट डॉ. संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
‘रिझूम थेरपी’ यंत्राद्वारे पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर डॉ. संजय कुलकर्णी यांनी रुग्णांसह पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बाणेर येथील युरोकुल रुग्णालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला देशातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरॉलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी, बाणेर-बालेवाडी मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे, रेडिओलॉजिस्ट डॉ. साकेत पटवर्धन, युरोकुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय चौधरी, प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रमोद भावे यांच्यासह रुग्ण व यंत्र पुरवणाऱ्या टीमची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “प्रोस्टेट ग्रंथींवरील पारंपरिक शस्त्रक्रियेला ‘ट्रांसूरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्ट्रेट’ (टीयूआरपी – TURP) म्हणून ओळखले जाते. यामध्ये रुग्णाला साधारण दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते. ही शस्त्रक्रिया तब्बल तासभर चालते. रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. शिवाय, संभोगानंतर रुग्णांची वीर्यस्खलन करण्याची क्षमता गमावून जाते.”
“यावर उपाय म्हणून युरोकुलने क्रांतिकारक तंत्रज्ञान भारतात आणले आहे. ‘रिझूम थेरपी’ या तंत्रज्ञानाद्वारे विना शस्त्रक्रिया प्रोस्टेट ग्रंथींचा वाढलेला भाग पाण्याच्या वाफेच्या साहाय्याने विरघळून टाकता येतो. ही थेरपी सामान्यत: बाह्यरुग्ण प्रक्रिया म्हणून केली जाते. या यंत्रामुळे प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचार अवघ्या १० मिनिटात होणार असून, रुग्ण त्याच दिवशी दोन ते तीन तासांत घरी जाऊ शकणार आहे. एक लहान कॅथेटर ५-७ दिवस ठेवला जाईल. या प्रक्रियेनंतर रुग्णांना होणाऱ्या त्रासापासून त्वरित आराम मिळू लागतो आणि जास्तीत जास्त फायदा तीन महिन्यात दिसू लागतो. या तंत्रज्ञानाच्या यशाचा दर ८० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे. प्रोस्टेटच्या समस्यांमुळे लघवी रोखून धरलेल्या रुग्णांवर उपचार कारण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. एवढेच नाही तर प्रोस्टेट ग्रंथीच्या सर्व रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘रिझूम’ तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. याचा सर्वाधिक फायदा तरुण रुग्णांना होणार आहे.” असे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
More Stories
बालेवाडी येथे स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान..
बालेवाडी येथे अमोल बालवडकर फाउंडेशन तर्फे हॅप्पी स्ट्रीट-2024 चे आयोजन…
श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान बाणेर येथे महाशिवरात्र आणि वर्धापन दिन उत्साहात साजरा…