September 17, 2024

Samrajya Ladha

महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये बँकांचे योगदान मोठे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे :

भारताची ही प्रगती वेगाने होत असून येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊ शकेल. चीन पेक्षा भारत हीच खऱ्या अर्थाने जगासाठी उत्पादन केंद्र होऊ शकेल. यासाठी वित्तीय संस्थांची जबाबदारी वाढली आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी बँकांचे मोठे योगदान असून महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

जनता सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा (७५ वर्षे) शुभारंभ सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी महाराज, बँकेचे अध्यक्ष रविंद्र हेजीब, उपाध्यक्ष ॲड.अलका पेटकर, संचालक सीए माधव माटे, प्रभाकर परांजपे, मकरंद अभ्यंकर, सीए किसन खाणेकर, किरण गांधी, मंदार लेले, अमित घैसास, मंदार फाटक, पद्मजा कुलकर्णी, श्रीरंग परस्पाटकी, मिलिंद लिमये, कानिफनाथ भगत, श्रीकांत पोतनीस, रघुराज बाहेती, प्रभाकर कांबळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप आदी यावेळी उपस्थित होते. बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. तसेच बँकेची गृहपत्रिका गरुडझेप विशेषांकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बॅंकिंगमध्ये अनेक बदल घडत आहेत. मूळ विचार न सोडता या बदलांना अनुसरून मार्केटशी समरस व्यवस्था बँकांना उभ्या कराव्या लागतील. जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा त्या प्रगतीला धरुन रहावे लागते. प्रगती सोबत येणाऱ्या आव्हानांचा सामना देखील करावा लागतो. आज सहकार क्षेत्रात स्पर्धक जास्त आहेत. आपण एकमेकांना सोबत घेऊन जर पुढे गेलो. तर सगळ्यांचीच प्रगती होईल.

ते पुढे म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी जनता सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवली. विश्वास आणि निस्वार्थ भावनेने काम करणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे. या विचारांवरच जनता बँकेची वाटचाल सुरू आहे त्यामुळेच जनता बँक आणि सर्वसामान्य खातेदार यांचे संबंध आजही घट्ट राहिले आहेत. जनता सहकारी बँकेची वाटचाल ही इतर बँकांसाठी आदर्शवत अशी आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्य ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्याचे धाडस जनता बँकेसारख्या सहकारी बँकांनी दिले. सरकार काही मर्यादेपर्यंतच सरकारी नोकऱ्या निर्माण करू शकते मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या माध्यमातून लाखो नोकऱ्या आणि उद्योग निर्माण झाले. त्यामुळे बँकांनी यापुढील काळामध्ये तरुणांना आणि विशेष करून छोट्या उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी. मी स्वतःही जनता सहकारी बँकेचा खातेदार आहे, माझ्या आर्थिक हालाखीच्या परिस्थितीमध्ये व्यवसाय निर्माण करण्यासाठी मला जनता सहकारी बँकेने मोलाची मदत केली त्यामुळेच मी उद्योजक म्हणून उभा राहू शकलो.

भूषण स्वामी महाराज म्हणाले, जनता सहकारी बँकेची वाटचाल ही रामदास स्वामींनी घालून दिलेले विचार आणि मूल्यांवर आधारित आहे, त्यामुळेच ही बँक सर्वसामान्यांसाठी केवळ एक बँक नव्हे तर एक विश्वासाचे दृढ नाते निर्माण झाले आहे त्यामुळेच सर्वसामान्य खातेदार कोणतीही भीती न बाळगता आपल्या कष्टाने कमावलेला पैसा या बँकेमध्ये ठेवतो. त्यामुळे त्याला ही बँक आपल्या कुटुंबाचे सदस्य आणि आधार वाटते, हेच खातेदार आणि बँकेतील नाते बँकेला आणि खातेदारांनाही दिवसेंदिवस मोठे करत आहे, असेही त्यांनी सांगितले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. जगदीश कश्यप यांनी प्रास्ताविक केले. ॲड. अलका पेटकर यांनी आभार मानले.