September 17, 2024

Samrajya Ladha

ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात मोठा स्फोट, ४ स्कुल बस जळून खाक…

ताथवडे :

पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आग लागल्यानं मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उठले. त्यामुळं मोठी आग लागल्याचे समोर आलं आहे. घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आलेलं असून ही आग गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्यानं मोठे स्फोट घडले आहेत. यामुळे नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. या घटनेत चार स्कूल बस आणि एक टँकर जळल्याची माहिती समोर आली आहे. स्कूलबस या गॅसवरील असल्यानं मोठा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तसंच आता आग आटोक्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरू झालं आहे.

स्फोटाच्या आवाजानं परिसरात एकच खळबळ उडाली : या घटने संदर्भात अधिक माहिती अशी की, ताथवडे येथे साधारण ११.३० ते ११.४५ चा सुमारास एका टँकरला भीषण आग लागली. टँकरमध्ये नेमकं काय होत हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यानंतर बाजूलाच पार्क केलेल्या स्कुल बस मध्ये आग लागली. स्कूल बस गॅस किटवर असल्यानं तीन ते चार स्फोट झाले. काहीवेळ एकामागोमाग स्फोटाचा आवाज आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. जेएसपीएम कॉलेजमधील हाॅस्टेलमध्ये राहणारी अनेक मुलं रस्त्यावर उतरले. या घटनेनंतर काही वेळ या भागात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश : घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तसंच त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, परिसरात शाळा आणि हाॅस्टेल असल्यानं येथं नेहमी वर्दळ असते. त्यामुळं हीच घटना जर सकाळी घडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.