November 21, 2024

Samrajya Ladha

बाणेर येथे पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन..

पुणे :

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि सिद्धिविनायक मित्र मंडळ, बाणेर यांच्या वतीने ३४वी किशोर/किशोरी गट व ७१वी वरिष्ठ गट (पुरुष/महिला) पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. बाणेर परिसरातील कबड्डी प्रेमी नागरीकांना कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे ग्रामीण असे तीन संंघ राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून यावेळी जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळावी म्हणून महाराष्ट्रातील ‘अ’ व ‘ब’ दर्जाच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील खेळाडूंना राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुणे विभागाच्या तीन गटांतील जिल्हा निवड चाचणी सुरू होत आहे. त्यातील पुणे शहर संघ निवडण्या करिता बाणेर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे या स्पर्धा यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शन आणि नियोजन करत आहे.