जेजुरी :
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी (ता. पुरंदर) येथील खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा उद्या सोमवार (ता.२८) पासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना म्हणजे ५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी गाभारा राहणार बंद
खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून, ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. त्या कामाला उद्या सोमवारपासून सुरवात होणार आहे.
दरम्यान, भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत दर्शनासाठी जाता येणार नाही. अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी स्पष्ट केले आहे.
खंडोबा देवस्थान कार्यालयामध्ये मंदिरातील विकासकामांच्या नियोजनाबाबत पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुजारी-सेवक व ग्रामस्थांनी अनेक सूचना केल्या.
यामध्ये मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असताना गडावर येणाऱ्या भाविकांचे अभिषेक, महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात याव्यात. आतील गाभाऱ्याचे काम झाल्यानंतर पंचलिंग मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. तेथील काम सुरु झाल्यानंतर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पुजा करु द्याव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
या बैठकीला मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे,
ॲड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.
More Stories
नांदे गावच्या युवा महिला सरपंच निकिता रानवडे यांची राष्टृवादी शरदचंद्र पवार गटाच्या जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी निवड..
विद्यार्थांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी पेरीविंकल स्कूलचा प्रयत्न, विज्ञानदिना निमित्त विज्ञान प्रदर्शनाचे पिरंगुट शाखेत आयोजन..
पेरिविंकल च्या पौड शाखेत शिवजयंती दिमाखात साजरी!!!