November 21, 2024

Samrajya Ladha

वाहनचालकांवर असलेला थकीत दंड तडजोडीत कमी करण्यात येणार : वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर

पुणे :

वाहतूक पोलीस प्रशासनाकडून आता थकित दंड प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांकडून मदत केंद्र सोमवारपासून (२८ ऑगस्ट) सुरू करण्यात येणार आहे. वाहनचालकांवर असलेला थकीत दंड तडजोडीत कमी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी येरवडा येथील वाहतूक उपायुक्त कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून ९ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. लोकअदालतीत प्रलंबित खटले तडजोडीने मार्गी लावण्यात येतात. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे. वाहनचालकांनी या सुविधेचा लाभ घेऊन तडजोडीत दंड कमी करुन घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

येरवडा येथील वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयात सोमवारपासून (२८ ऑगस्ट) वाहनचालकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत मदत केंद्राचे कामकाज सुरू राहणार आहे. प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. वाहनचालकांना दंडाच्या रक्कमेतून सूट देण्यात येणार आहे, असे मगर यांनी नमूद केले आहे.